राहुल यांच्या भाषणातील वादग्रस्त भाग वगळला; मोदींच्या जगातून सत्य काढता येऊ शकते, वास्तवातून नाही - राहुल गांधी

लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील काही भाग काढून टाकण्यात आले आहेत. याबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जगातून सत्य काढून टाकता येऊ शकते, वास्तवातून नाही’, असे संसदीय संकुलाबाहेर वार्ताहरांशी बोलताना सांगितले.
राहुल यांच्या भाषणातील वादग्रस्त भाग वगळला; मोदींच्या जगातून सत्य काढता येऊ शकते, वास्तवातून नाही - राहुल गांधी
(SANSAD TV/PTI Photo)
Published on

नवी दिल्ली : लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील काही भाग काढून टाकण्यात आले आहेत. याबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जगातून सत्य काढून टाकता येऊ शकते, वास्तवातून नाही’, असे संसदीय संकुलाबाहेर वार्ताहरांशी बोलताना सांगितले.

आपल्या भाषणातील निवडक भाग वगळल्याबद्दल राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठविले आहे. आपण विचारपूर्वक केलेले भाष्य सभागृहाच्या कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकणे हे संसदीय लोकशाही सिद्धांताच्या विरुद्ध आहे. त्यामुळे ते भाष्य कामकाजाच्या नोंदींमध्ये पुन्हा समाविष्ट करावे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या मागणीच्या समर्थनार्थ भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी केलेल्या भाषणाचे उदाहरण दिले आहे. अनुराग ठाकूर यांनी केलेल्या भाषणांमध्ये आरोपांची जंत्री होती, मात्र त्या भाषणातील केवळ एकच शब्द काढून टाकण्यात आला ही बाब आश्चर्यकारक आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून प्रथमच भाषण केले. त्यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली आणि सत्तारूढ पक्षाचे नेते जातीयतेच्या नावावर जनतेमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील काही भाग सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आला.

सभागृहाच्या कामकाजातून काही टिप्पणी काढून टाकण्याचा अध्यक्षांना अधिकार आहे, मात्र अट अशी आहे की, लोकसभेच्या नियम ३८० मध्ये जे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे ते भाष्य काढून टाकण्यात यावे, असे विरोधी पक्षनेत्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. मात्र, ज्या पद्धतीने आपल्या भाषणातील नोंदी कामकाजातून काढून टाकण्यात आल्या ते पाहून धक्काच बसला. ज्या नोंदी कामकाजातून काढून टाकण्यात आल्या त्या नियम ३८० च्या अंतर्गत येत नाहीत, असेही ते म्हणाले. प्रत्येक लोकप्रतिनिधीला घटनेने भाषास्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, असेही ते म्हणाले. आपल्याला जे बोलावयाचे होते ते आपण बोललो आणि ते सत्य आहे, त्यांना जो भाग काढून टाकावयाचा आहे तो त्यांनी काढावा, मात्र विजय अखेर सत्याचाच होतो, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in