ब्राह्मण-शुद्रांविषयी वादग्रस्त पोस्ट, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; म्हणाले, "त्या श्लोकाचे..."

सरमा यांनी केलेल्या पोस्टनंतर मोठा वाद निर्माण झाला, यामुळे त्यांनी गुरुवारी आपली पोस्ट डिलीट करत माफी मागितली. गीतेमधील एका श्लोकाचे आसामी भाषेत चुकीचे भाषांतर झाले, अशी सारवासारव त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
ब्राह्मण-शुद्रांविषयी वादग्रस्त पोस्ट, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; म्हणाले, "त्या श्लोकाचे..."

ब्राह्मण-शुद्रांविषयीची वादग्रस्त पोस्ट डिलीट केल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दुसरी एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. 26 डिसेंबर रोजी त्यांनी 'एक्स'वर भगवद्‌गीतेमधील एक श्लोक पोस्ट केला होता. यावरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर जातीभेदाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत हल्लाबोल केला. त्यानंतर बिस्वा यांच्याकडून ती पोस्ट डिलीट करण्यात आली. आता त्यांनी याबाबत मागितली आहे. भगवद्‌गीतेच्या श्लोकाचा दाखला देत, "ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करणे शुद्रांचे नैसर्गिक कर्तव्य आहे" अशा आशयाचा श्लोक सरमा यांनी अपलोड केला होता.

सरमा यांनी केलेल्या पोस्टनंतर मोठा वाद निर्माण झाला, यामुळे त्यांनी गुरुवारी आपली पोस्ट डिलीट करत माफी मागितली. गीतेमधील एका श्लोकाचे आसामी भाषेत चुकीचे भाषांतर झाले, अशी सारवासारव त्यांच्याकडून करण्यात आली आहे. ते म्हणाले, "मी नेहमीप्रमाणे माझ्या सोशल मीडिया हँडलवर भगवद्‌गीतेतील एक श्लोक अपलोड केला होता. मी आतापर्यंत 668 श्लोक पोस्ट केले आहेत. नुकतेच माझ्या टीम मेंबरकडून 18 व्या अध्यायातील 44 वा श्लोक चुकीच्या भाषांतरासह टाकला गेला. मला ही चूक लक्षात येताच मी ती पोस्ट डिलीट केली. आसाम राज्य जातिहीन समाजाचे परिपूर्ण चित्र प्रतिबिंबित करते. या पोस्टमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो ", अशी पोस्ट त्यांनी 'एक्स'वर केली आहे.

विरोधकांनी उठवली टीकेची झोड

सरमा यांनी केलेल्या या पोस्टनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील 'एक्स'वर पोस्ट करत बिस्वा यांना धारेवर धरलं. ते म्हणाले, "घटनात्मक पदावर काम करताना 'प्रत्येक भारतीय नागरिकाशी समान व्यवहार केला जाईल', अशी शपथ घेतली जाते. मात्र, तुमची विचारधारा किती क्रूर आहे, हे यातून दिसून येते. या विचारधारेचा सामना आसाममधील मुस्लीम जनता गेल्या काही वर्षांपासून करत आहे." तसेच, हिंदू धर्म स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय या तत्वांच्या विरोधात असल्याचेही ते म्हणाले.

सीपीआयच्या अधिकृत 'एक्स'हँडलवरुन देखील सरमा यांच्या ट्विटचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत समाचार घेण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in