‘इस्रो’तही वादाचे ग्रहण ;सोमनाथ यांचा आत्मचरित्रातून माजी अध्यक्षांवर निशाणा

चांद्रयान-२ मोहीम सिवन यांच्यामुळेच अपयशी ठरल्याचा ठपकाही सोमनाथ यांनी पुस्तकात ठेवला आहे.
‘इस्रो’तही वादाचे ग्रहण ;सोमनाथ यांचा आत्मचरित्रातून माजी अध्यक्षांवर निशाणा

बंगळुरू : चांद्रयान-३ आणि सौरमोहिमेच्या यशाने नुकत्याच उजळून निघालेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) दोन अध्यक्षांमधील सुंदोपसुंदी आता चव्हाट्यावर आली आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन यांनी आपल्या पदोन्नतीत खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप इस्रोचे विद्यमान अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे. सिवन यांनी मात्र आपण हे पुस्तक पाहिलेले नाही, असे म्हणत या प्रकरणावर भाष्य करण्याचे टाळले आहे. या वादानंतर सोमनाथ यांनी आत्मचरित्र मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.

चांद्रयान-३ मोहिमेच्या अभूतपूर्व यशानंतर इस्रोचे विद्यमान अध्यक्ष एस. सोमनाथ यांचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. सोमनाथ यांचे निलावू कुडिचा सिम्हगळ अशा शीर्षकाचे आत्मचरित्र प्रसिद्धीच्या बेतात होते. त्यात त्यांनी इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन यांच्यावर बरीच टीका केली आहे. इस्रोतील सामान्य सेवेतून वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त झाल्यावर सिवन आणि सोमनाथ या दोघांनाही काही काळ सेवेत मुदतवाढ मिळाली होती. २०१८ साली इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष ए. एस. किरण कुमार निवृत्त झाल्यानंतर दोघांच्याही नावाचा इस्रोच्या अध्यक्षपदासाठी विचार केला जात होता. पण, त्यावेळी तो मान सिवन यांना मिळाला. इस्रोचे अध्यक्षपद मिळाल्यानंतरही सिवन यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालकपद सोडले नव्हते. ते वास्तविक सोमनाथ यांना मिळणे अपेक्षित होते. पण त्यासाठी सोमनाथ यांना पुढील सहा महिने वाट पाहावी लागली. सोमनाथ यांनी सिवन यांना त्यासाठी विनंती करता सिवन यांनी टाळाटाळ केली. अखेर त्या केंद्राचे माजी संचालक डॉ. बी. एन. सुरेश यांच्या मध्यस्थीनंतर सोमनाथ यांना ते पद मिळाले. इस्रोच्या अध्यक्षपदावरून तीन वर्षांनी निवृत्त झाल्यावरही सिवन ते पद सोडण्यास तयार नव्हते आणि आणखी मुदतवाढ मिळवण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप सोमनाथ यांनी पुस्तकात केला आहे.

याशिवाय चांद्रयान-२ मोहीम सिवन यांच्यामुळेच अपयशी ठरल्याचा ठपकाही सोमनाथ यांनी पुस्तकात ठेवला आहे. सिवन यांनी किरण कुमार यांच्याकडून सूत्रे स्वीकारल्यानंतर चांद्रयान-२ मोहिमेत बरेच बदल केले. वास्तविक चांद्रयान-२ मोहिमेच्या सॉप्टवेअरमध्ये काही त्रुटी होत्या, पण सिवन यांनी घाईगडबडीने मोहीम पुढे रेटली. तसेच आपले अपयश झाकण्यासाठी अखेरच्या टप्प्यात यानाचा संपर्क तुटल्याचे सांगितले, असेही सोमनाथ यांनी पुस्तकात म्हटले आहे. चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सिवन यांचे सांत्वन करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी सिवन यांनी आपल्याला पंतप्रधानांच्या पुढे येऊदेखील दिले नाही, असा आरोप सोमनाथ यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in