हनुमान झेंड्यावरून कर्नाटकात वादंग; काँग्रेस-भाजप समोरासमोर

सध्या परिसरात तणाव आहे. बंगळुरूमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले असून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हनुमान झेंड्यावरून कर्नाटकात वादंग; काँग्रेस-भाजप समोरासमोर

बंगळुरू : कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील केरागोडू गावात फडकावण्यात आलेल्या १०८ फुटी हनुमान (भगवा) झेंड्याच्या प्रकरणावरून भाजप-काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले आहे. पोलिसांनी गावात जमावबंदी लागू केली आहे. सध्या परिसरात तणाव आहे. बंगळुरूमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले असून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरागोडू आणि शेजारच्या १२ गावांमधील गावकरी आणि काही संघटनांनी रंगमंदिर या ठिकाणी ध्वज स्थापना करण्यासाठी निधी गोळा केला होता. भाजप, जनता दल सेक्युलरचे कार्यकर्ते यात आघाडीवर होते, अशीही माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान ध्वज १०८ फुटांचा होता. पण, काही लोकांकडून त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हनुमान झेंडा उतरवण्याची विनंती केली होती. मात्र, गावकरी झेंडा न उतरवण्यावर ठाम होते. काही लोक याचे राजकारण करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावात तणाव निर्माण झाल्याने आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले.

गावकऱ्यांना भाजप आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली आहे. गावकऱ्यांनी झेंडा काढण्याच्या विरोधात दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शनिवारी हा वाद विकोपाला गेला. रविवारी ग्रामपंचायतचे कर्मचारी झेंडा काढण्यासाठी आले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी गो बॅकच्या घोषणा देत विरोध दर्शवला. स्थानिक काँग्रेस आमदार रवी कुमार यांचे काही फलक फाडण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाने राजकीय वळण घेतले. त्यामुळे पोलिसांकडून फौजफाटा वाढवण्यात आला आहे. भाजपने झेंडा काढण्याच्या विरोधात आंदोलन तीव्र केले आहे. भाजपने कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यानंतर भगवा झेंडा उतरवण्यात आला आहे.

राष्ट्रध्वज फडकावण्यास परवानगी

या घटनाक्रमाबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, ‘राष्ट्रीय ध्वज फडकावण्याऐवजी हनुमान ध्वज फडकवणे, ही बाब योग्य नाही. मी त्या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज फडकवण्यास सांगितले आहे.’ मंड्या जिल्ह्याचे प्रभारी मंत्री एन. चेलुवरयास्वामी यांनी सांगितले की, राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचीच संमती देण्यात आली होती. २६ जानेवारीच्या दिवशी त्यांनी भारताचा झेंडा फडकावला आणि त्यानंतर हनुमान ध्वज उभारला. ही बाब योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in