वॉशिंग्टन : एका शीख व्यक्तीने भारतात पगडी अथवा कडे घालावे की नाही. एक शीख म्हणून ती व्यक्ती गुरुद्वारात जाऊ शकते की नाही. यासाठी लढाई आहे आणि ही केवळ त्यांच्यासाठीच नाही तर सर्व धर्मांसाठी आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत केले. या विधानावरून देशात वाद माजला आहे.
अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी शीख समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून भाजपने राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. भाजपमधील शीख नेते राहुल गांधी यांच्या शीख समाजासंदर्भातील वक्तव्यावरून त्यांना न्यायालयात खेचण्याची धमकी देत आहेत.
यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, लोकसभेतील विरोधी पक्षनेते परदेशात 'संवेदनशील मुद्द्यांवर' भाष्य करत 'धोकादायक कथा' पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल यांनी परदेशात राहणाऱ्या शीख समुदायाच्या सदस्यांमध्ये खोटे पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. शिखांच्या पगडी आणि कड्यांसंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. राहुल गांधी सध्या राष्ट्रीय अस्मिता, एकता आणि विविधता यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर विधाने करत आहेत. एवढेच नाही, तर हे अत्यंत भयानक आहे की, राहुल गांधी माझ्या समाजातील लोकांमध्ये खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे अमेरिकेत आपला उदरनिर्वाह करत आहेत.
...तर राहुल यांच्याविरोधात खटला भरणार
भाजप प्रवक्ता आर. पी. सिंग यांनी मंगळवारी राहुल गांधी यांना भारतात शीख समाजासंदर्भातील विधानाचा पुनरुच्चार करण्याचे आव्हान दिले.