सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून वादंग, पूर्व भारतातील लोक चिनी, तर दक्षिण भारतीय आफ्रिकन लोकांसारखे दिसतात!

‘पूर्व भारतातील लोक चिनी लोकांसारखे तर दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन लोकांसारखे दिसतात,’ असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी केले आहे.
सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून वादंग, पूर्व भारतातील लोक चिनी, तर दक्षिण भारतीय आफ्रिकन लोकांसारखे दिसतात!

नवी दिल्ली : ‘पूर्व भारतातील लोक चिनी लोकांसारखे तर दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन लोकांसारखे दिसतात,’ असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी केले आहे. भाजपने या वर्णद्वेषी वक्तव्यावर जोरदार टीका केली असून त्यामुळे विरोधी पक्षाचे फुटीर राजकारण उजेडात आले असल्याचे म्हटले आहे. तर पित्रोदांचे वक्तव्य दुर्दैवी आणि अस्वीकारार्ह आहे, पक्ष त्याच्याशी सहमत नाही, असे म्हणण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सॅम पित्रोदा यांनी वारसा कराच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष चांगलाच कोंडीत सापडला आहे.

स्वातंत्र्यापासून आम्ही अत्यंत आनंदी वातावरणात (एक-दोन अपवाद वगळता) एकत्र राहिलो आहोत, भारतात विविधतेत एकता आहे. पूर्व भारतातील लोक चिनी लोकांसारखे, पश्चिम भारतातील लोक अरबी लोकांसारखे, उत्तरेकडील लोक कदाचित श्वेतवर्णियांसारखे तर दक्षिणेकडील लोक आफ्रिकेतील लोकांसारखे दिसतात, मात्र आम्ही सर्वजण बहीण-भावासारखे आहोत. आम्ही विविध भाषा, धर्म, परंपरा यांचा सन्मान राखतो, असे पित्रोदा यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले असून ती समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे.

काँग्रेसचे मुखवटे गळले - भाजप

काँग्रेस पक्षाचे फुटीर राजकारण समोर आले आहे, लोकसभा निवडणुकीचे टप्पे जसे पार पडत चालले आहेत तसे काँग्रेसचे मुखवटे गळून पडत आहेत, असे भाजपने म्हटले आहे.

देशवासीय त्वचेच्या रंगावरून अपमान सहन करणार नाहीत

काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी त्वचेच्या रंगावरून केलेल्या शेरेबाजीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. त्वचेच्या रंगावरून केलेला अपमान देशवासीय कधीही सहन करणार नाहीत, असे मोदी यांनी नमूद केले. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या त्वचेचा रंग गडद आहे त्यामुळेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांचा पराभव व्हावा अशी राष्ट्रीय पक्षाची इच्छा होती हे आता आपल्या लक्षात आले आहे, असेही मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढविताना म्हटले आहे. आपल्या देशात त्वचेच्या रंगावरून लोकांची क्षमता ठरविणार का, त्वचेच्या रंगावरून खेळ खेळण्याची अनुमती शहजाद्याला कोणी दिली, असा सवालही पंतप्रधानांनी केला. आपल्याला कोणी शिवीगाळ केली तर त्याचा राग येत नाही, आपण ते सहन करतो, मात्र शहजाद्याच्या तत्त्ववेत्त्याने इतकी मोठी शिवी दिली आहे की त्याने आपण संतप्त झालो आहोत, असे मोदी म्हणाले.

काँग्रेसचे कानावर हात

भारतातील विविधतेबद्दल सॅम पित्रोदा यांनी जे सांगितले ते दुर्दैवी आणि अस्वीकारार्ह असल्याचे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आणि त्याच्याशी असहमती दर्शविली आहे.

पित्रोदांचा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

वारसा करापाठोपाठ वर्णद्वेषी वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेस पक्षावर वर्णद्वेषी शिक्का मारला. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पित्रोदा यांचा राजीनामा स्वीकारल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी 'एक्स'वर जाहीर केले.

logo
marathi.freepressjournal.in