इंडिया आघाडीसाठी निमंत्रक ठरवावा लागेल; उद्धव ठाकरे यांचे मतप्रदर्शन

इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिल्लीत आले आहेत.
इंडिया आघाडीसाठी निमंत्रक ठरवावा लागेल;
उद्धव ठाकरे यांचे मतप्रदर्शन
PM

मुंबई: एनडीएकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेता म्हणून भक्कम चेहरा आहे. मात्र, विरोधी इंडिया आघाडीकडे त्यांच्यासमोर देण्यासाठी एकही चेहरा नाही, अशी टीका सातत्याने इंडिया आघाडीवर करण्यात येते. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी थेट पंतप्रधानपदासाठीचा चेहरा नसला तरी आघाडीसाठी कोणीतरी एक निमंत्रक लागेल. प्रत्येकजण आपापल्या राज्यात व्यस्त असतात, त्यांना एकत्रित आणण्यासाठी एक व्यक्ती लागेल, असे मत व्यक्त केले आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिल्लीत आले आहेत. त्यानिमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते.

इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून नितीशकुमार यांचे बॅनर लागले असल्याबद्दल विचारले असता, आम्ही एकत्र आलो आहोत. कोणाच्याही डोक्यात नेतेपदाची हवा गेलेली नाही. देश वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ज्या पद्धतीने खासदारांचे निलंबन होत आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळातही जे चालले आहे ते पाहता देशातील लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाही जगली तर देश जगेल. आज देश वाचविण्यासाठीच आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

ऑगस्टनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नव्हती. पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि आघाडीतील इतर घटक पक्ष सहभागी होते. आता तीन राज्यांच्या निकालांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. जानेवारीपासून निवडणुकांचे वर्ष सुरू होईल. एप्रिल आणि मे महिन्यात निवडणुका होतील. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागावे लागेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

जनतेचा निर्णय अंतिम : उद्धव ठाकरे

इंडिया आघाडीतील नेत्यांनी पंतप्रधानपदासाठी तुमच्या नावावर सहमती दर्शविली तर जबाबदारी घेणार का, या प्रश्नावर मी मुख्यमंत्रीपद जबाबदारी म्हणून स्वीकारले होते. एका क्षणात ते सोडूनही दिले. मी कोणतीही वेडीवाकडी स्वप्‍न पाहत नाही. देश आणि महाराष्ट्राची जनता आमच्याकडे पाहत आहे. मी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहून काय उपयोग, शेवटी जनताच निर्णय घेते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in