(फोटो सौजन्य - PTI)
(फोटो सौजन्य - PTI)

कोरोनामुळे चिंता वाढली; राज्यात २०९, तर दिल्लीत १०४ रुग्ण, देशातील रुग्णसंख्या १००९

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने (कोविड-१९) डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात १००० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७५२ रुग्णांची गेल्या पाच-सहा दिवसांत नोंद झाली आहे. सध्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण केरळमध्ये असून महाराष्ट्रात २०९ रुग्ण आढळले आहेत.
Published on

नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने (कोविड-१९) डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात १००० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७५२ रुग्णांची गेल्या पाच-सहा दिवसांत नोंद झाली आहे. सध्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण केरळमध्ये असून महाराष्ट्रात २०९ रुग्ण आढळले आहेत.

केरळमध्ये आतापर्यंत ४३० कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर महाराष्ट्रात २०९, दिल्लीत १०४, उत्तर प्रदेशात १५, पश्चिम बंगालमध्ये १२, गुजरातमध्ये ८३ व कर्नाटकात ४७ सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. दिल्लीत गेल्या एका आठवड्यात ९९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्ली, मुंबई व केरळसह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाची भीती पसरली आहे.

पुष्टी नाही

दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात चार, केरळमध्ये दोन व कर्नाटकात एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे. मात्र शासकीय पातळीवरून या वृत्ताची पुष्टी करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र, दिल्ली व केरळमधील नागरिकांची चिंता वाढलेली असताना काही राज्ये व केंद्रशासित प्रदेश अद्याप कोरोनापासून चारहात लांब आहेत. अंदमान व निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीरमध्ये अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

आरोग्य विभागाच्या सूचना

देशाच्या राजधानीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिल्ली सरकारने सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. कोरोनाबाधित नमुने (सॅम्पल्स) जीनोम सीक्वेन्सिंगसाठी रुग्णालयात पाठवा. कोरोनाच्या चाचण्या व त्याचे अहवाल दररोज दिल्ली राज्य आरोग्य विभागाला द्या, त्यांच्या संकेतस्थळावर व आयएचआयपी प्लॅटफॉर्मवर अपलोड करा, अशा सूचना आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना दिल्या आहेत.

पुन्हा लॉकडाऊन?

दरम्यान, तोंडावर मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांमध्ये अंतर ठेवा, स्वच्छता राखा, हात स्वच्छ ठेवा, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. पुन्हा लॉकडाऊनसारखी स्थिती नसली तरी तशी स्थिती पुन्हा उद‌्भवू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनापासून वाचण्यासाठीचे नागरिकांनी सर्व नियम पाळावेत, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

महाराष्ट्रात चार मृत्यू

केरळनंतर महाराष्ट्रात कोरोनाचे २०९ सक्रिय रुग्ण आहेत, तर आत्तापर्यंत चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत कोरोनाचे ३५ रुग्ण आहेत. त्यामुळे सोमवारी आलेल्या अहवालानंतर महाराष्ट्रात २४० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जे चार मृत्यू राज्यात झाले आहेत त्यांना आधी मधुमेह, उच्च रक्तदाब हे विकार होते, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

logo
marathi.freepressjournal.in