केजरीवाल यांना ईडी कोठडी; २८ मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचे कोर्टाचे आदेश : तुरुंगामधून चालवणार कारभार

शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाण्यापूर्वी केजरीवाल यांनी सांगितले की, मी तुरुंगात राहिलो किंवा बाहेर राहिलो तरी माझे जीवन देशसेवेसाठी समर्पित असेल.
केजरीवाल यांना ईडी कोठडी; २८ मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचे कोर्टाचे आदेश : तुरुंगामधून चालवणार कारभार

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी अटक केलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीने केजरीवाल यांच्या चौकशीसाठी १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली. सुनावणीअंती न्यायालयाने केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे मुख्यमंत्री केजरीवाल दिल्ली सरकारचा कारभार तुरुंगातून चालवणार आहेत.

अबकारी धोरण घोटाळ्यात ईडीने केजरीवाल यांना सलग नऊ वेळा समन्स जारी करूनदेखील केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे गुरुवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे (आप) नेते गोपाल राय यांनी जाहीर केले की, आप आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते केजरीवाल यांच्या अटकेविरोधात शनिवारी सकाळी १० वाजता दिल्लीच्या आयटीओ भागातील शहीद पार्क येथे निषेध निदर्शने करतील. शनिवार, मार्च २३ हा शहीद दिन आहे. याच दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले होते. या निषेध आंदोलनाला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानदेखील उपस्थित राहणार आहेत.

दिल्ली शहरात २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात येईल. २५ मार्च रोजी आपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांना भाजपच्या कारवाईबद्दल माहिती देऊन जागृती करून होळी साजरी करणार आहेत. तर २६ मार्च रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घातला जाईल. तसेच देशभरात निषेध नोंदवला जाईल, असे आपने जाहीर केले आहे.

विविध राजकीय पक्षांनी केला अटकेचा निषेध

देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, केंद्रातील भाजप सरकार विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर ठरवून कारवाई करत आहे. मात्र, भाजपशी संबंधित भ्रष्ट नेत्यांना अभय दिले जात आहे. केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांनी म्हटले की, केंद्राच्या या कृतीमुळे दिल्लीच्या नागरिकांचा विश्वासघात झाला आहे.

हा आचारसंहितेचा भंग - आप

देशात १६ मार्चपासून लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झालेली असताना केजरीवाल यांना अटक करणे हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी टीका आपचे नेते गोपाल राय यांनी केली.

माझे जीवन देशसेवेसाठी समर्पित

शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाण्यापूर्वी केजरीवाल यांनी सांगितले की, मी तुरुंगात राहिलो किंवा बाहेर राहिलो तरी माझे जीवन देशसेवेसाठी समर्पित असेल.

logo
marathi.freepressjournal.in