मुंबई, दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ; रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश

देशातील विविध भागांमध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढताना दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई महाराष्ट्रासह दिल्ली, केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या सर्व राज्यांमध्ये या महिन्यात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत.
मुंबई, दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ; रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश
Published on

नवी दिल्ली : देशातील विविध भागांमध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढताना दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई महाराष्ट्रासह दिल्ली, केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या सर्व राज्यांमध्ये या महिन्यात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत.

रुग्णाचा मृत्यू नाही

राष्ट्रीय राजधानीत गेल्या तीन वर्षांत प्रथमच कोरोनाची लागण झालेले २३ रुग्ण आढळले आहेत. असे असले तरी बहुतेक प्रकरणे ही सौम्य असून काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच आतापर्यंत कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही.

चिंताजनक नाही

दक्षिण आशियामध्ये जेएन.१ व्हेरिएंटच्या प्रसारामुळे कोरोना रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. हा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा सब-व्हेरिएंट आहे. तज्ज्ञांच्या मते हा व्हेरिएंट चांगलाच सक्रिय असला तरी जागतिक आरोग्य संघटनेकडून याचे वर्गीकरण चिंताजनक व्हेरिएंट असे करण्यात आलेले नाही.

या संक्रमणाची लक्षणे बऱ्याचदा सौम्य स्वरूपाची आहेत आणि लागण झालेले रुग्ण चार दिवसांच्या आत बरे होत आहेत. ताप, नाकातून पाणी वाहणे, गळा खवखवणे, डोकेदुखी, चक्कर आणि थकवा येणे ही काही सामान्य लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात.

दिल्लीत कोरोना व्हायरसचे २३ रुग्ण आढळले आहेत, ज्यामुळे येथील भाजप सरकारने रुग्णालयांना बेड, ऑक्सिजन सिलिंडर, चाचणी किट्स आणि लसी तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली सरकारने रुग्णालयांना आरोग्य डेटासंबंधी इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्मवर दररोज इन्फ्लूएंझासारखे आजार आणि सिव्हर अक्युट रेस्पिरेटरी आजारांच्या प्रकरणांची संख्या अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्रात काय स्थिती

मुंबईत मे महिन्यात आतापर्यंत ९५ रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण कोविड संसर्गांपैकी बहुतेक जण हे मुंबईतीलच आहेत. गंभीर बाब म्हणजे येथे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. मुंबई महापालिकेने लक्षणे असणाऱ्या सर्वांना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. फक्त १६ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. तसेच ठाणे येथे गेल्या तीन दिवसांत कोरोनाचे तब्बल १० रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने सर्व आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in