
नवी दिल्ली : केरळसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून राज्यात मृतांची संख्या ६वर पोहोचली आहे. सध्या कोरोना रुग्ण वाढता वाढत असून कोविडची चौथी लाट आली, तर त्याचा परिणाम २१ ते २८ दिवसांपर्यंत राहील. ती दुसऱ्या लाटेसारखी घातक ठरणार नाही, असे मत भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) कानपूरचे संचालक प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, “२०२२ नंतर नवीन प्रकारामुळे कोविड रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. परंतु कोणतीही गंभीर परिस्थिती नाही. यावेळी जास्त काळजी करण्याची गरज नाही, असे मला वाटते.”
बनारस हिंदू विद्यापीठाचे प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांनी सांगितले की, “कोविडची चौथी लाट आली तर त्याचा परिणाम २१ ते २८ दिवसांपर्यंत राहील. ती दुसऱ्या लाटेसारखी घातक ठरणार नाही. विशेष म्हणजे, लस घेतलेल्या व्यक्तींनीही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण नवीन व्हेरिएंट इतका ताकदवान आहे की, लस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. लसीकरणाची प्रतिकारशक्ती अजूनही पूर्णपणे कमकुवत झालेली नाही. हे निश्चितच तुमच्या शरीराला नवीन व्हेरिएंटशी लढण्यास मदत करू शकते.”