
नवी दिल्ली : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रालोआचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अपेक्षित विजय मिळविला. राधाकृष्णन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा सरळ लढतीमध्ये पराभव केला. राधाकृष्णन यांना ४५२, तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या निवडणुकीत इंडिया आघाडीची १० पेक्षा अधिक मते फुटली आहेत.
राज्यसभेचे महासचिव व निवडणूक अधिकारी पी. सी. मोदी यांनी निवडणुकीचा निकाल रात्री घोषित केला.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. यात भारत राष्ट्र समिती (४ राज्यसभा खासदार), बिजू जनता दल (७ राज्यसभा खासदार) आणि शिरोमणी अकाली दल (१ लोकसभा आणि २ राज्यसभा खासदार) यांनी मतदानात भाग घेतला नाही. भारताच्या १७ व्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. यासाठी एकूण ९८ टक्के मतदान झाले.
राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली, तर रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३०० मते मिळाली आहेत. या निवडणुकीत ७६७ खासदारांनी मतदान केले होते. त्यापैकी १५ खासदारांची मते अवैध ठरली. ‘एनडीए’ला संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत असल्याने सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात होता. विरोधक त्यांची मते एकसंध राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. ‘क्रॉस व्होटिंग’मुळे राधाकृष्णन यांचे मताधिक्क्य घटणार की वाढणार, याबद्दल उत्सुकता होती.
लोकसभा आणि राज्यसभेत मिळून ‘एनडीए’चे एकूण ४२७ खासदार आहेत. जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाने राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यांच्या पक्षाचे दोन्ही सभागृहात मिळून ११ खासदार आहेत. या सगळ्या ११ खासदारांची मते राधाकृष्णन यांना मिळाली असे गृहित धरल्यास मतांचा आकडा ४३८ वर जातो. पण राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळालेली आहेत. याचा अर्थ विरोधकांची १४ मते फुटली असून विरोधी आघाडीतील १४ खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संसदेत लोकसभा आणि राज्यसभेसह एकूण ७८८ खासदार आहेत. सध्या दोन्ही सभागृहातील ७ जागा रिक्त आहेत. त्यामुळे एकूण ७८१ खासदारांना मतदान करायचे होते, त्यापैकी १३ जणांनी मतदानात भाग घेतला नाही. यामध्ये बीआरएसचे ४, बिजदचे ७, अकाली दलाचे १ आणि १ अपक्ष खासदाराने मतदान केले नाही. तर ४२७ एनडीए खासदारांनी मतदान केले. या निवडणुकीत एकूण ७६८ खासदारांनी मतदान केले.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी १० वाजता मतदान सुरू झाले आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत ते चालले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदान केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन राम मेघवाल आणि किरेन रिजिजू, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, भाजप खासदार कंगना राणावत आणि सपा नेते राम गोपाल यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी मतदान केले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही निवडणुकीत मतदान केले.
देशाच्या प्रगतीत योगदान देतील - राष्ट्रपती मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपतीपद निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले. आपल्या सार्वजनिक जीवनातील अनेक दशकांच्या अनुभवाचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी ते महत्त्वाचे योगदान देतील, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
संसदीय मूल्यांना मजबूत करतील - मोदी
सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले. त्यांचे जीवन कायमच समाजसेवा व गरीबांचे सबलीकरणासाठी समर्पित आहे. ते संसदीय मूल्यांना मजबूत करतील व संवाद कायम ठेवतील, असे मोदी म्हणाले.