सी. पी. राधाकृष्णन NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार; महाराष्ट्राच्या राज्यपालांना मोठी संधी, २१ ऑगस्टला अर्ज दाखल करणार

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी आता महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करण्यासाठी रविवारी बोलावलेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी आता महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करण्यासाठी रविवारी बोलावलेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना एनडीएचा उमेदवार निवडण्याचे अधिकार दिले होते. त्यानंतर भाजपच्या संसदीय मंडळाची महत्त्वाची बैठक रविवारी संध्याकाळी नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीला मोदी, गृहमंत्री अमित शहा, नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्यात सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत राधाकृष्णन यांचे नाव जाहीर केले. राधाकृष्णन हे २१ ऑगस्ट रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी एनडीएप्रणित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असतील. राधाकृष्णन हे सध्या जुलै २०२४ पासून महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते आणि तेलंगणा आणि पुद्दुचेरीचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला होता.

राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

चंद्रपुरम पोन्नूस्वामी राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. ‘बीबीए’चे शिक्षण घेतल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून ते राजकारणात आले आणि १९९८ आणि १९९९ मध्ये कोइम्बतूरचे खासदार झाले. १९९८ मध्ये ते १.५ लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आणि १९९९ मध्येही ते ५५,००० मतांनी विजयी झाले. तामिळनाडू भाजप अध्यक्ष म्हणून राधाकृष्णन यांनी १९ हजार किमी लांबीची रथयात्रा काढली.

२००४ ते २००७ पर्यंत ते तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते. तसेच २०२० ते २०२२ पर्यंत ते भाजपचे केरळ प्रभारी होते. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. मात्र, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असूनही ते पराभूत झाले होते. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर दीड वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in