४० टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे २५ टक्के जणांवर गंभीर गुन्हे; एडीआरचा खळबळजनक अहवाल

४० टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे २५ टक्के जणांवर गंभीर गुन्हे; एडीआरचा खळबळजनक अहवाल

प्रतिज्ञापत्राचा हवाला देत एडीआरने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे

नवी दिल्ली : राजकारणाचे गुन्हेगारीकरण आता नवे राहिलेले नाही. खून, अपहरण, खंडणी, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपी देशाच्या पवित्र संसदेत बसल्याची यापूर्वी अनेक उदाहरणे पहायला मिळाली आहेत. मात्र, सध्याच्या संसदेतील तब्बल ४० टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने दिली. खासदारांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्हेगारी प्रकरणांबाबत अहवाल एडीआरने प्रसिद्ध केला आहे.

देशातील एकूण ७६३ खासदारांपैकी ३०६ खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १९४ खासदारांवर खून आणि महिलांवरील अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देत एडीआरने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

राज्यसभेच्या २२५ सदस्यांपैकी २७ (१२ टक्के) जण अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश खासदार भाजपचे आहेत. भाजपकडे २२५ पैकी ८५ सदस्य आहेत. त्यापैकी ६ म्हणजे ७ टक्के खासदार अब्जाधीश आहेत. काँग्रेसच्या ३० सदस्यांपैकी ४ म्हणजे १३ टक्के अब्जाधीश आहेत.

वायएसआर काँग्रेसचे ९ पैकी ४ खासदार, आम आदमी पार्टीचे १० पैकी ३ आणि बीआरएसचे तीन खासदार अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश खासदार ४५ टक्के आंध्र प्रदेश आणि ४३ टक्के तेलंगणातील आहेत.

सध्याच्या राज्यसभा खासदारांची सरासरी मालमत्ता ८०.९३ कोटी रुपये आहे. भाजप खासदारांची सरासरी मालमत्ता ३०.३४ कोटी रुपये आहे. काँग्रेसच्या ३० खासदारांची सरासरी मालमत्ता ५१.६५ कोटी रुपये, तृणमूल काँग्रेसच्या १३ सदस्यांची सरासरी मालमत्ता ३.५५ कोटी रुपये, वायएसआर काँग्रेसच्या ९ खासदारांची मालमत्ता ३९६.६८ कोटी रुपये, भारत राष्ट्र समितीच्या ७ खासदारांची मालमत्ता ७९९.४६ कोटी रुपये आहे.

बिहारमधील ४१ खासदारांवर गुन्हे

लक्षद्वीपमधील एक खासदार, केरळमधील २९ पैकी २३ खासदार, बिहारमधील ५६ पैकी ४१ खासदार, महाराष्ट्रातील ६५ पैकी ३७ खासदार, तेलंगणातील २४ पैकी १३ खासदार आणि दिल्लीतील १० पैकी ५ खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in