राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अनेक राज्यांमधून क्रॉस व्होटिंग

पंजाबमधील अकाली दलाच्या आमदारांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अनेक राज्यांमधून क्रॉस व्होटिंग

१५व्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत अनेक राज्यांमधून क्रॉस व्होटिंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक आमदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे सांगण्यात आले.

झारखंड व गुजरातमधील राष्ट्रवादीचे आमदार आणि हरयाणा व ओडिशातील काँग्रेसच्या आमदारांनी सद‌‌्सद‌‌‌्‌‌विवेक बुद्धीला स्मरून आपण मतदान केल्याचे सांगितले. पंजाबमधील अकाली दलाच्या आमदारांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. आसाममध्ये ‘आययूडीएफ’चे आमदार करीमुद्दीन बरभुइयान यांनी दावा केला की, राज्यातील काँग्रेसच्या जवळपास २० आमदारांनी मुर्मू यांना मतदान केले. उत्तर प्रदेशात सपाचे शिवपाल सिंग यादव यांनी यशवंत सिन्हा यांना आपण पाठिंबा दिला नसल्याचा दावा केला. हरयाणात काँग्रेस आमदार कुलदीप बिष्णोई यांनीही आपण आपल्या सद‌्सद्‌‌विवेक बुद्धीला स्मरून मतदान केल्याचे सांगितले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीने मतदान होते व कोणताही पक्ष आपल्या खासदार व आमदारांना व्हिप जारी करू शकत नाही. गुजरातमध्ये राष्ट्रवादीचे आमदार कांधल जडेजा, यूपीमध्ये सपा आमदार शहजील इस्लाम आणि ओडिशात काँग्रेसचे आमदार मुकीम यांनी क्रॉस व्होटिंग केले आहे. सर्वांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले. झारखंडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार कमलेश सिंग यांनी आपण मुर्मू यांना मतदान केल्याचे सांगितले.

बंगालमध्ये भाजपला

क्रॉस व्होटिंगची भीती

बंगालमध्ये क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी भाजपने सर्वप्रथम आपल्या आमदारांना कोलकाता येथील हॉटेलमध्ये ठेवले. त्यानंतर सर्व आमदारांना बसमधून विधानसभेत आणण्यात आले. बिजद, वायएसआरसीपी, बसपा, तेलुगू देसम व जनता दल (एस) यांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेमध्ये दोन गट तयार झाले असून त्यांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे

आठ खासदार मतदानापासून वंचित

भाजपचे खासदार सन्नी देओलसह आठ खासदार राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहिले. यामध्ये भाजपचे दोन व कॉंग्रेस, सपा, बसपा, शिवसेना, एआयएमआयएम व द्रमुकचा प्रत्येकी एक खासदार यांचा समावेश आहे. भाजपचे सन्नी देओल, संजय धोत्रे, शिवसेनेचे गजानन कीर्तीकर हे आजारी असल्याने तर बसपाचे अतुल सिंग तुरुंगात असल्याने मतदान करू शकले नाहीत. तर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील, कॉंग्रेसचे मोहम्मद सादिक, सपाचे शफीकुर रेहमान बर्क व द्रमुकचे टीआर परिवेंधर हे अनुपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीचे नेते बबनराव लोणीकर यांनी काँग्रेसनेते नितीन राऊत यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. नितीन राऊत यांनी रांगेत उभे राहून मतदान न करता आपल्याआधी मतदानाचा हक्क बजावल्याचा आरोप लोणीकर यांनी केला आहे. याविरोधात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नितीन राऊत यांचे मत बाद केले जावे, अशी मागणीही केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in