रांची/नवी दिल्ली : झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने सोमवारी आठ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये एक कोटी रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आलेल्या एका अत्यंत जहाल नक्षलवाद्याचाही समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बोकारो जिल्ह्यातील लालपानिया परिसरातील लुगू हिल्स येथे पहाटे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली. त्यामध्ये आठ नक्षलवादी ठार झाले असून त्यांच्याकडून तीन रायफली, एक एसएलआर, देशी बनावटीच्या आठ बंदुका आणि एक पिस्तूल, असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
जहाल नक्षलवादी गटाचा एक म्होरक्या प्रयाग मांझी ऊर्फ विवेक हा या चकमकीत ठार झाला असून त्याच्यावर एक कोटी रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते, तर अन्य दोन नक्षलवादी अरविंद यादव आणि साहेबराम मांझी यांच्यावर अनुक्रमे २५ लाख आणि १० लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
कारवाई सुरूच राहणार - शहा
दरम्यान, मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवादाचा नि:पात करण्याचे सरकारने ठरविले असून त्यानुसार नक्षलवाद्यांविरुद्धची कारवाई यापुढेही अधिक जोमाने सुरू राहणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी येथे सांगितले.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून स्फोट, सीएएफचा जवान शहीद
छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सशस्त्र दलाचा एक जवान शहीद झाला. मनोज पुजारी (२६) असे शहीद जवानाचे नाव आहे. तोयनार ते फरसेगढ दरम्यान मोरमेड गावातील जंगलात सोमवारी हा स्फोट झाला. तोयनार ते फरसेगढ रम्यान रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या रस्त्याच्या सुरक्षेसाठी सीएएफ बटालियनच्या जवानांना गस्तीवर तैनात करण्यात आले होते. यादरम्यान सीएएफच्या १९ व्या बटालियनचे जवान मनोज पुजारी यांचा नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी बॉम्बवर पाय पडला. यामुळे बॉम्बचा स्फोट झाला आणि यात मनोज पुजारी शहीद झाले.छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सशस्त्र दलाचा एक जवान शहीद झाला. मनोज पुजारी (२६) असे शहीद जवानाचे नाव आहे. तोयनार ते फरसेगढ दरम्यान मोरमेड गावातील जंगलात सोमवारी हा स्फोट झाला. तोयनार ते फरसेगढ रम्यान रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या रस्त्याच्या सुरक्षेसाठी सीएएफ बटालियनच्या जवानांना गस्तीवर तैनात करण्यात आले होते. यादरम्यान सीएएफच्या १९ व्या बटालियनचे जवान मनोज पुजारी यांचा नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी बॉम्बवर पाय पडला. यामुळे बॉम्बचा स्फोट झाला आणि यात मनोज पुजारी शहीद झाले.