पाकिस्तानसाठी हेरगिरी: सीआरपीएफच्या अधिकाऱ्याला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) एका सहाय्यक उपनिरीक्षकाला अटक केली आहे.
(फोटो सौ. ANI)
(फोटो सौ. ANI)
Published on

नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) एका सहाय्यक उपनिरीक्षकाला अटक केली आहे.

या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव मोतीराम जाट असे असून तो हेरगिरी कारवायांमध्ये सहभागी आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित माहिती तो पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना २०२३ पासून देत असल्याचे उघड झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

सेवेतून बडतर्फ

गोपनीय माहिती देण्याच्या मोबदल्यात पातिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांकडून विविध स्रोतांद्वारे जाट याला मोबदला मिळत होता. त्याला एनआयएने दिल्लीतून अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, जाट याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

६ जूनपर्यंत कोठडी

सीआरपीएफने जाटच्या समाजमाध्यमांवरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले होते. तेव्हा त्याने प्रस्थापित निकष आणि शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. जाट याला विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची ६ जूनपर्यंत एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in