

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धामुळे तेल क्षेत्रातील पायाभूत रचना बाधित झाली, तर कच्च्या तेलाची किंमत प्रति पिंप १०० डॉलरपेक्षा अधिक होऊ शकते, असा अंदाज आयसीआयसीआय बँकेच्या अहवालात नमूद केला आहे.
कच्च्या तेलाच्या किमती भविष्यात ७५ ते ९५ प्रति पिंप राहू शकतात. परंतु तेल किमती यापेक्षा अधिक वाढण्याचा धोका आहे. जर तेल पायाभूत रचनेत कोणतीही बाधा आली, तर १०० डॉलर प्रति पिंपाच्या मर्यादेपेक्षा वर जाण्याचा धोका कायम आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर ७८.५२ डॉलर प्रति पिंप आहे.
भू-राजकीय तणाव वाढल्याने अमेरिकेने आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले आहेत, जेथे शासन बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. इराणनेही खाडी भागातील लष्करी ठाणे, नागरी भाग आणि तेल पायाभूत सुविधा लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले आहे. हा संघर्ष लवकर थांबण्याची शक्यता कमी आहे, असे अहवालात नमूद केले.
चालू संघर्ष आणि होर्मूझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे ऊर्जा किमतींमध्ये अचानक वाढीचा धोका निर्माण होऊ शकतो. होर्मूझची सामुद्रधुनी ही जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गातून जगातील ६० टक्के तेल वाहतूक होत असते. यात कोणतीही अडथळा आल्यास जागतिक पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.
महागाई वाढण्याची शक्यता
आयसीआयसीआय बँकेने म्हटले की, इराण आणि अमेरिका संघर्ष सुमारे एक महिन्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे, परंतु आणखीही हे युद्ध लांबले जाऊ शकते. परिणामी महागाईमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.