काळ्या वर्णावरून पतीला हिणवणे क्रूरता

पतीला घटस्फोट मंजूर ; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल
काळ्या वर्णावरून पतीला हिणवणे क्रूरता

नवी दिल्ली : काळ्य‌ा वर्णावरून पतीला सतत अपमानित करणे ही क्रूरता आहे. घटस्फोट घेण्यासाठी हे कारण ठोस आहे. असे सांगून कर्नाटक उच्च न्यायालयाने नवऱ्याला आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यास मान्यता दिली.

न्या. आलोक आराधे व न्या. अनंत हेगडे यांच्या खंडपीठाने सांगितले की, काळ्या वर्णाचा असल्याने पत्नी पतीला सतत अपमानित करत होती. मुलीसाठी तो पत्नीला अपमान सहन करत होता. याच कारणावरून ती त्याला सोडून गेली होती. हिंदू विवाह नियमाच्या कलम १३ (१) (अ) नुसार घटस्फोटाचा दावा मंजूर केला जात आहे. तसेच वर्णभेद लपवण्यासाठी पत्नीने पतीवर अनैतिक संबंधाचे आरोपही केले. हा प्रकारही क्रूरता आहे.

बंगळुरूत राहणाऱ्या या दाम्पत्याचे २००७ मध्ये लग्न झाले. त्यांना एक मुलगी आहे. पतीने २०१२ मध्ये कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. संबंधित पत्नीने कलम ४९८ अ अंतर्गत पती व सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. घरगुती हिंसाचारप्रकरणीही तिने एक तक्रार दाखल करून ती मुलीला सोडून आपल्या आई-वडिलांसोबत राहू लागली.

कुटुंब न्यायालयात तिने सर्व आरोप फेटाळले. पती व सासरच्या मंडळींविरोधात तिने छळाचा आरोप केला. कुटुंब न्यायालयाने २०१७ मध्ये घटस्फोटाची पतीची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर पतीने उच्च न्यायालयात दावा दाखल केला.

उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवला. उच्च न्यायालयाने सांगितले की, पत्नीने पतीकडे परत जाण्याचे प्रयत्न केले नाहीत. पतीचा काळा रंग असल्याने तिला नांदण्यात कोणताही रस राहिलेला नव्हता, हे दिलेल्या साक्षींमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कुटुंब न्यायालयाने या प्रकरणी घटस्फोटाचा निर्णय द्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

logo
marathi.freepressjournal.in