हल्द्वानी : उत्तराखंड राज्यातील हल्द्वानी या हिंसाचारग्रस्त शहराच्या बाहेरील भागातून संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. शहरात गुरुवारी बेकायदेशीरपणे बांधलेल्या मदरशाच्या विध्वंसावर जमावाने जाळपोळ आणि तोडफोड केलेल्या बनभूलपुरा भागात मात्र संचारबंदी कायम आहे.
या घटनेसंबंधात पंधरवड्यात निष्कर्ष काढण्याच्या सूचना देत दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य सचिव राधा रतुरी यांनी या संबंधात जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, कुमाऊँचे आयुक्त दीपक रावत हे दंडाधिकारी चौकशी करतील. ते १५ दिवसांत आपला अहवाल सरकारला सादर करतील.
नैनितालच्या जिल्हा दंडाधिकारी वंदना सिंह यांनी शनिवारी कर्फ्यू अंतर्गत असलेल्या क्षेत्राला बनभूलपुरापर्यंत मर्यादित ठेवण्याचा आदेश जारी केला. कर्फ्यू आता संपूर्ण बनभूलपुरा क्षेत्रापुरता मर्यादित करण्यात आला आहे, ज्यामध्ये आर्मी कॅन्टोन्मेंट (वर्कशॉप लाईनसह)- तिकोनिया-तीनपाणी आणि गौलापार बायपासच्या परिघातील क्षेत्र देखील समाविष्ट आहे. नैनिताल-बरेली रस्त्यावर वाहनांची ये-जा आणि व्यावसायिक संस्था-दुकाने या निर्बंधापासून मुक्त असतील, असेही त्यात म्हटले आहे. तथापि, संचारबंदी लागू असलेल्या भागात केवळ रुग्णालये आणि वैद्यकीय दुकाने सुरू राहतील. संचारबंदी अंशत: उठवल्यानंतर शनिवारी शहराच्या बाहेरील दुकाने उघडली, परंतु शाळा बंद राहिल्या. प्रभावित भागात सतत गस्त सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी), कायदा आणि सुव्यवस्था, ए.पी. अंशुमन यांनी सांगितले. अंशुमन हे हल्द्वानी शहरात तळ ठोकून आहेत.
गुरुवारच्या हिंसाचारात सहभागी असलेल्या पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच तीन एफआयआरमध्ये सोळा जणांना आरोपी म्हणून नोंदवण्यात आले आहे, असे सांगून एडीजी म्हणाले की, त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे आणि उर्वरितांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अफवा पसरू नयेत यासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येत आहे. बनभूलपुरा भागातील रहिवाशांना, वेळोवेळी आवश्यक वस्तू खरेदी करण्याची परवानगी दिली जात आहे. काठगोदामपर्यंत गाड्यांची वाहतूकही पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या कोणतीही नवीन अनुचित घटना घडली नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. गुरुवारी झालेल्या हिंसाचारात सहा दंगलखोर ठार झाले तर साठपेक्षा अधिक लोक जखमी झाले. कारण स्थानिकांनी पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकले, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यामध्ये आश्रय घेण्यास भाग पाडले, त्यानंतर जमावाने आगी लावल्या होत्या. या हिंसाचारात जखमी झालेल्या एका पत्रकारासह सात जणांवर शुक्रवारी तीन वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.