नवी दिल्ली : गुजरातच्या कच्छला धडकण्याची शक्यता असलेल्या ‘असना’ या चक्रीवादळाने अरबी समुद्रात आपली दिशा बदलली असून ते ओमानच्या दिशेने निघाले आहे. यामुळे गुजरातचा धोका टळला आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कच्छच्या मांडवी भागात जोरदार पाऊस व जोरदार वारे वाहत होते. हवामान खात्याने यापूर्वी सांगितले होते की, कच्छ येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने शुक्रवारी चक्रीवादळ निर्माण होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील झोपड्या व कच्च्या घरात
राहणाऱ्यांना शाळा किंवा मंदिरात जाण्यास सांगितले होते. मात्र, या चक्रीवादळाने दिशा बदलली तरीही त्याचे परिणाम सौराष्ट्र-कच्छच्या किनारपट्टी जाणवणार आहेत. वादळामुळे जोरदार वारे वाहणार असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या सात दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. ४ दिवसांत गुजरातमध्ये ३२ जणांचा बळी गेला आहे, तर १८ हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ व लष्कराला तैनात केले आहे. चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर कच्छ, राजकोट, जामनगर, पोरबंदर, जुनागढ, द्वारकेत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कच्छ आणि राजकोटमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
८० वर्षांत ऑगस्टमध्ये केवळ तीन चक्रीवादळ
अरबी समुद्रात चक्रीवादळ होण्याचे प्रमाण दुर्मिळ आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत केवळ तीनवेळा चक्रीवादळ आले आहे. १९४४, १९६४ व १९७६ मध्ये यापूर्वी चक्रीवादळ झाले होते. ही तिन्ही चक्रीवादळे किनारपट्टीवर पोहचताच शमली होती, तर पश्चिम बंगालच्या उपसागरात १३२ वर्षांत २८ चक्रीवादळे आली आहेत.