चक्रीवादळ 'दितवाह'चा तमिळनाडूला तडाखा

तमिळनाडू किनाऱ्याकडे सरकणारे चक्रीवादळ 'दितवाह' मुळे राज्यातील किनारी भाग आणि कावेरी जिल्ह्यांत शनिवारी मुसळधार पाऊस झाला. रामनाथपुरम आणि नागपट्टणम या दोन जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे सलग दुसऱ्या दिवशी रामेश्वरममध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.
चक्रीवादळ 'दितवाह'चा तमिळनाडूला तडाखा
चक्रीवादळ 'दितवाह'चा तमिळनाडूला तडाखाछायाचित्र : ग्रोक
Published on

चेन्नई : तमिळनाडू किनाऱ्याकडे सरकणारे चक्रीवादळ 'दितवाह' मुळे राज्यातील किनारी भाग आणि कावेरी जिल्ह्यांत शनिवारी मुसळधार पाऊस झाला. रामनाथपुरम आणि नागपट्टणम या दोन जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे सलग दुसऱ्या दिवशी रामेश्वरममध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. नागपट्टणममध्ये काही झाडे उन्मळून पडली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. राज्याचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री के. के. एस. एस. आर. रामचंद्रन यांनी सांगितले की, चक्रीवादळ 'दितवाह' हे चेन्नई किनारपट्टीला धडक देईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र राज्य सरकार युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य राबवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सुमारे २८ आपत्ती प्रतिसाद पथके, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांचा समावेश आहे.

आम्ही इतर राज्यांतून आणखी १० पथके एअर लिफ्ट करण्याची योजना आखली आहे. हवाई दल आणि तटरक्षक दलाला सतर्क केले आहे. तसेच उद्या जिल्ह्यांमध्ये निरीक्षण पथकांना पाठवले जाईल, असे मंत्री म्हणाले.

'सध्या कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी १६ जनावरे मृत झाली असून २४ झोपड्यांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत पावसामुळे मोठा परिणाम झालेला नाही. मात्र राज्य सरकार परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून बचाव आणि मदतकार्यासाठी पथके सज्ज आहेत,' असे त्यांनी स्पष्ट केले.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ चेन्नई किनाऱ्याच्या समांतर जाऊ शकते आणि त्यामुळे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जनतेने सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दिलेल्या सूचना पाळाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एनडीआरएफची १४ पथके विलुप्पुरम, चेंगलपट्ट, तिरुवल्लूर, नागपट्टणम, तिरुवारूर, तंजावूर, पुदुकोट्टई आणि मायिलादुथुराई आदी संवेदनशील जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहेत. अतिरिक्त पथके पुद्दुचेरी आणि चेन्नईसाठी नियुक्त करण्यात आली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in