

हैदराबाद : बंगालच्या उपसागरावर ‘मोंथा’ चक्रीवादळ घोंगावत असून भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अलर्ट जारी केला आहे. २८ ऑक्टोबरला हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्वेकडे तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेच्या दिशेने सरकत आहे. यामुळे ते भयंकर चक्रीवादळात रुपांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हे कमी दाबाचे क्षेत्र २६ ऑक्टोबरपर्यंत खोल दाबाच्या पट्ट्यात आणि २७ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर मच्छलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान काकीनाडाजवळ ११० प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘मोंथा’ चक्रीवादळाबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
ओडिसाच्या किनाऱ्यावरही समुद्राची स्थिती अत्यंत खराब राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवसांमध्ये तमिळनाडू व पुदुचेरीच्या किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.