Cyclone Remal: रेमल चक्रीवादळ अधिक तीव्र; प. बंगाल सज्ज - कोलकाता विमानतळ, बंदर बंद

Pre-Monsoon Cyclone Of 2024: बंगालच्या उपसागरातील रेमल चक्रीवादळ शनिवारी अधिक तीव्र बनले असून रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगालच्या सागर बेट आणि बांगलादेशच्या खेपुपाडा दरम्यान ते जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे.
Indian Meteorological Department
Published on

कोलकाता : बंगालच्या उपसागरातील रेमल चक्रीवादळ शनिवारी अधिक तीव्र बनले असून रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगालच्या सागर बेट आणि बांगलादेशच्या खेपुपाडा दरम्यान ते जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. प. बंगाल, त्रिपुरा, ओदिशा आदी राज्यांत तसेच शेजारील बांगलादेशातही वादळाला तोंड देण्यासाठी खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. कोलकाता विमानतळ आणि बंदर यांचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातील या मान्सूनपूर्व हंगामातील रेमल हे पहिले चक्रीवादळ आहे. शनिवारी त्याची तीव्रता वाढली असून ते खेपुपाडापासून अंदाजे ३६० किमी आणि सागर बेटापासून ३५० अंतरावर पोहोचले होते. ताशी १३५ किमी प्रतितास वेगाने वाहणारे चक्रीवादळ २६ मे रोजी मध्यरात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या लगतच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने २६-२७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओदिशाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील सखल भाग जलमय होण्याची शक्यता आहे.

रेमाल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विविध सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतूक रविवारी दुपारपासून २१ तासांसाठी स्थगित केली आहे, असे विमानतळ संचालक पट्टाभी यांनी एका निवेदनात सांगितले.

चक्रीवादळाचा अंदाज लक्षात घेता कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील सर्व मालवाहतूक आणि कंटेनर हाताळणी रविवार संध्याकाळपासून १२ तासांसाठी स्थगित करण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंदराचे कामकाज बंद ठेवण्यात येईल.

चक्रीवादळाच्या प्रभावाचा सामना करण्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी बंदराचे अध्यक्ष रथेंद्र रामन यांनी शनिवारी बैठक घेतली. बंदर अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी आंतरविभागीय सहकार्यावर भर दिला.

बांगलादेशात खबरदारीचे उपाय

ढाका : बांगलादेशने रविवारी येणाऱ्या रेमल चक्रीवादळापासून बचावाची तयारी केली असून पुरेशा कोरड्या अन्नाचा पुरवठा आणि पाण्याने सुसज्ज सुमारे ४००० निवारे तयार केले आहेत. सातखीरा आणि कॉक्स बाजार या किनारी जिल्ह्यांमध्ये संभाव्य उच्च भरतीची लाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. चट्टोग्राम, कॉक्स बाजार, मोंग्ला आणि पायरा या सागरी बंदरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी ८० हजार स्वयंसेवक तयार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in