

नवी दिल्ली : देशातील राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या काळात वाटल्या जाणाऱ्या रेवड्यांवर ‘आरबीआय’चे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. रेवड्यांनी निवडणुका जिंकल्या जाऊ शकतात, पण देशाची प्रगती होऊ शकत नाही, असा इशारा त्यांनी दिला.
एका दैनिकात लिहिलेल्या लेखामध्ये ते म्हणाले की, बिहारची निवडणूक ही ‘स्पर्धात्मक लोकशाहीतील मास्टरक्लास’ बनली. कारण राजकीय पक्ष जनतेला एकाहून एक खिरापती वाटत होते. तसेच अवास्तव आश्वासने देत होते. सत्ताधारी रालोआने सुमारे १.२ कोटी महिलांना निवडणूक मोहिमेदरम्यानच १० हजार रुपये वाटले. तर विरोधी महागठबंधन आघाडीने प्रत्येक महिलेला ३० हजार रुपये आणि राज्यातील प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी देण्याचे वचन दिले. ही आश्वासने अवास्तव होती. जणू राजकीय पक्षांनी सर्वच वित्तीय गणित थांबवले आहे, अशी टीका त्यांनी केली.