‘डी ४’ करणार ड्रोनचा पाडाव; DRDO कडून ‘ड्रोनविरोधी संरक्षण यंत्रणा’ विकसित

सध्या युद्ध तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. अतिप्रगत लढाऊ विमाने, ध्वनीपेक्षा वेगाने मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसोबतच ड्रोन हे शस्त्र म्हणून वापरले जात आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रछायाचित्र सौजन्य : एक्स (@writetake)
Published on

सध्या युद्ध तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. अतिप्रगत लढाऊ विमाने, ध्वनीपेक्षा वेगाने मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसोबतच ड्रोन हे शस्त्र म्हणून वापरले जात आहे. मानवी हानी टाळण्यासाठी ड्रोनचा वापर हल्ल्यासाठी केला जात असल्याचे जगभरात दिसत आहे. त्यामुळे या ड्रोनचा पाडाव करण्यासाठी भारताच्या डीआरडीओने स्वदेशी बनावटीची ‘डी ४’ ही ‘ड्रोनविरोधी संरक्षण यंत्रणा’ विकसित केली आहे.

भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) ‘डी ४’ (ड्रोनचा शोध, लक्ष्य व उद्ध्वस्त) ही यंत्रणा तयार केली. ही यंत्रणा लवकरच देशाच्या महत्त्वाच्या शहरी भागात तैनात केली जाणार आहे.

ड्रोन सध्याच्या घडीला वापरले जाणारे बहुपयोगी यंत्र आहे. संरक्षण व बिगर संरक्षण क्षेत्रात ड्रोनचा वापर केला जातो. पाकिस्तानातून भारतात हेरगिरी किंवा अन्य कामांसाठी ड्रोनचा वापर झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. त्यामुळे सावध होत भारताने ही ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित केली. ही यंत्रणा ड्रोन कुठे आहे हे शोधून त्याच्यावर मारा करून त्याला उद‌्ध्वस्त करते. ही यंत्रणा तत्काळ ड्रोनचा माग काढते. त्यानंतर लेझरवर आधारित यंत्रणा ड्रोनला पाडते. ही यंत्रणा ३ किमीच्या अंतरापर्यंत काम करते.

‘डीआरडीओ’च्या वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले की, हे ‘इंटरसेप्टर ड्रोन’ उड्डाणादरम्यानच शत्रूच्या ड्रोनना स्वतंत्रपणे हाताळतील. हे ड्रोन भूप्रदेश, धोक्याची पातळी आणि वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेग, अचूकतासह डिझाइन केलेले आहेत.

‘डीआरडीओ’च्या माहितीनुसार, या ‘डी ४’ यंत्रणेत अनेक सेन्सर, मारा करण्याची क्षमता असणारी आयुधे आहेत. ती शत्रूच्या ड्रोनला ओळखून त्याला पाडू शकते. यात रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळखणे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित धोक्याची क्षमता ओळखणे, इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने रोखणे आदी नवीन संकल्पनाचा वापर करण्यात आला आहे.

ही ‘डी ४’ यंत्रणा सीमेवर तैनात केली आहे. याचा वापर घुसखोरी रोखायला, ड्रोन पाडायला केला जात आहे. तसेच शस्त्रास्त्र डेपो, हवाई दलाचे तळ, कम्युनिकेशन सेंटर, सीमांवरील चौक्या येथे केला जात आहे. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणांकडून या यंत्रणेचा वापर सुरू झाला आहे.

शहरी केंद्रांमध्ये तैनात करण्यासाठी नवीन पिढीच्या ‘डी ४’ प्रणालींत शत्रू ओळखण्यासाठी ‘चेहरा’ (फेशियल) आणि पेलोड (सामुग्री) ओळख, ५ जी जाम करणे आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी पोर्टेबल ‘डी ४’ आदींचा समावेश आहे.

भारतीय लष्कराकडून ७ नवीन स्वदेशी ड्रोन यंत्रणा विकसित

भारतीय लष्कराने सात नवीन स्वदेशी ड्रोन यंत्रणा विकसित केल्या आहेत. या यंत्रणा चीनजवळील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर तैनात केल्या आहेत. ही ड्रोनविरोधी यंत्रणा शत्रूचे ड्रोन जाम करू शकते. तसेच लेझरचा वापर करून या ड्रोनचा पाडाव करण्यास ते सक्षम आहे. ५ ते ८ किमीच्या अंतरातील ड्रोन शोधण्याची क्षमता या यंत्रणेची आहे, असे भारतीय लष्कराच्या ध्वज अधिकाऱ्याने सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in