वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी 'दंगल' चित्रपटात अभिनेता आमिर खानच्या धाकट्या मुलीची (ज्युनियर बबिता फोगट) भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे वयाच्या १९ व्या वर्षीच आजारपणाने निधन झाल्याचे वृत्त आले आहे. गेल्या काही दिवासांपासून सुहानीवर फरीदाबादच्या एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
काही दिवसांपूर्वीच सुहानीच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. यावरील उपचारासाठी सुरू असलेल्या औषधांमुळे एक्शन होऊन तिच्या शरीरात संपूर्ण पाणी झाले होते. याच आजारामुळे शुक्रवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला, असे वृत्त दैनिक जागरणने दिले आहे. सुहानीवर आजच फरीदाबाद सेक्टर-१५ मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दंगलमधील अभिनयासाठी सुहानीचे कौतुक झाले होते. चित्रपटात आमिर, साक्षी तन्वर आणि जायरा वसीमसोबत काम केल्यानंतर ती काही टीव्ही जाहिरातींमध्ये दिसली होती. मात्र, नंतर तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून ती सोशल मीडियावरही जास्त सक्रीय नव्हती.