नियम मोडणाऱ्यांचा बचाव करणारे घातक -पंतप्रधान मोदी

गेल्या दहा वर्षांत त्यांच्या सरकारने २००० जुने कायदे रद्द केले आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
नियम मोडणाऱ्यांचा बचाव करणारे घातक -पंतप्रधान मोदी

मुंबई : सभागृहाचे नियम मोडणाऱ्या सदस्यांना पाठीशी घालणारे आणि त्यांच्या वर्तनाचा बचाव करणारे राजकीय पक्ष संसद आणि राज्यांच्या विधानसभेसाठी चांगले नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबईतील परिषदेत ऑनलाईन संवादात सांगितले.

८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत (एआयपीओसी) ऑनलाईन संवाद साधताना मोदी म्हणाले की, निवडून आलेल्या तरुण प्रतिनिधींना विधी समित्यांमध्ये अधिक संधी दिली पाहिजे, जेणेकरून ते धोरणनिर्मितीत अधिक सहभागी होऊ शकतील. ते म्हणाले की, एक वेळ अशी होती की, सभागृहातील कोणत्याही सदस्याने नियम मोडले आणि त्या सदस्यावर कारवाई केली तर, सभागृहातील ज्येष्ठ सदस्य त्याच्याशी बोलायचे जेणेकरून भविष्यात त्याने ही चूक पुन्हा करू नये आणि सभागृहाचे नियम मोडू नयेत. पण आजकाल काही राजकीय पक्ष अशा सदस्यांच्या समर्थनार्थ उभे राहतात आणि त्यांच्या चुकांचा बचाव करतात. संसद किंवा राज्य विधानसभेची परिस्थिती चांगली नाही, असेही मोदी म्हणाले. ई-विधान आणि डिजिटल संसद उपक्रमाच्या माध्यमातून 'वन नेशन, वन लेजिस्लेटिव्ह प्लॅटफॉर्म'वर काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांत त्यांच्या सरकारने २००० जुने कायदे रद्द केले आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in