
उत्तराखंड : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग परिसरात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मिरिक आणि कुर्सियांगला जोडणारा दुडिया लोखंडी पूल कोसळल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला असून मुसळधार पावसामुळे बचावकार्यावर देखील परिणाम झाला आहे.
भूतानमधून वाहत येणाऱ्या वांगचू नदीचा जलस्तर धोकादायक पातळीवर वाढल्यामुळे उत्तर बंगालमधील जिल्ह्यांवर महापुराचे संकट उभे राहिले आहे. भूस्खलनामुळे दार्जिलिंग आणि आसपासच्या भागात मोठी हानी झाली असून जोरदार पावसामुळे अनेक भागांतील जलस्तर वेगाने वाढत आहे, त्यामुळे सखल भागांतील स्थिती गंभीर बनली आहे.
तिस्ता, जलढाका आणि तोरसा या नद्यांचा जलस्तर धोक्याच्या खुणेवरून वाहत आहे. हवामान विभागाने पूर आणि पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. प्रभावित भागात युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, तसेच लोकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे.
मुसळधार पावसामुळे दार्जिलिंग, कलिंपोंग आणि कुर्सियांग या डोंगराळ भागांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सिलीगुडी, तराई आणि डुआर्सशी असलेले दळणवळण जवळपास पूर्णतः ठप्प झाल्याची माहिती पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी दिली.