तैवानवर युद्धाचे गडद सावट; चीनने चारही बाजूंनी घेरले

चीनने नौदल, हवाई दल व लष्कर, क्षेपणास्त्र विभाग या सर्वांना तैनात केले असून लष्करी सरावाच्या निमित्ताने तैवानवरील दबाव वाढवला
तैवानवर युद्धाचे गडद सावट; चीनने चारही 
बाजूंनी घेरले

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानहून दक्षिण कोरियाला रवाना झाल्या आहेत. तत्पूर्वी, त्यांनी तैवानच्या संसदेला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांचीही भेट घेतली. दुसरीकडे, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने गुरुवार ते रविवार या कालावधीत तैवानच्या आसपासच्या सहा भागांत लष्करी सराव करण्याचे जाहीर केले आहे. या निमित्ताने प्रत्यक्षात चीनने तैवानला चारही बाजूंनी घेरल्यामुळे तैवानवर युद्धाचे सावट गडद झाले आहे.

चीनने नौदल, हवाई दल व लष्कर, क्षेपणास्त्र विभाग या सर्वांना तैनात केले असून लष्करी सरावाच्या निमित्ताने तैवानवरील दबाव वाढवला आहे. रशियाने ज्याप्रमाणे लष्करी सरावासाठी जमवाजमव करून युक्रेनवर हल्ला केला, त्याप्रमाणे चीनकडून जमवाजमव करण्यात येत असल्याने तैवानवर युद्धाचे संकट दिसून येत आहे. दरम्यान, पेलोसी म्हणाल्या, “सुरक्षेच्या मुद्द्यावर अमेरिका तैवानला पाठिंबा देईल. आम्ही प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत आहोत. तैवानच्या मैत्रीचा आम्हाला अभिमान आहे. तैवानच्या पाठीशी उभे राहण्याचे ४३ वर्षांपूर्वी अमेरिकेने दिलेले वचन आजही ते पूर्ण करत आहेत. पेलोसी यांना ‘ऑर्डर ऑफ प्रोपियस क्लाउड्स विथ स्पेशल ग्रँड कॉर्डन’ हा तैवानचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. पेलोसी म्हणाल्या, “अमेरिका तैवानची बाजू सोडणार नाही. आमच्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाची तैवानला भेट या देशाच्या चैतन्यशील लोकशाहीला पाठिंबा देण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचा सन्मान करते.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in