शेवपूर : मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणण्यात आलेला 'पवन' हा नर चित्ता मंगळवारी मृतावस्थेत आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 'गामिनी' हा आफ्रिकेतील पाच महिन्यांचा चित्ता ५ ऑगस्ट रोजी मृतावस्थेत आढळला होता, त्यानंतर आता ‘पवन’ चित्ता मृतावस्थेत आढळला आहे. उद्यानात झुडुपांमधील एका नाल्यात ‘पवन’ निपचित पडलेला सकाळी आढळला, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पशुवैद्य घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी तपासणी केली असता चित्त्याचा डोक्यापासूनचा शरीराचा निम्मा भाग पाण्याखाली असल्याचे आढळले. त्याच्या शरीरावर अन्यत्र कोठेही जखमा आढळल्या नाहीत. ‘पवन’चा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, पोस्टमार्टेम अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण निश्चित केले जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. आता कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांची संख्या २४ असून त्यामध्ये १२ बछड्यांचा समावेश आहे.