नवी दिल्ली : ज्यांनी घटनेला विरोध केला आणि घटना रद्द करण्याचे जे आवाहन करीत आहेत तेच संविधान हत्या दिवस पाळण्याचे जाहीर करून नकारात्मक राजकारण करीत आहेत, असा हल्ला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी शनिवारी भाजपवर चढविला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दरवर्षी २५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्यात येईल, असे शुक्रवारी जाहीर केले होते. त्यानंतर गांधी-वढेरा यांनी वरील मत व्यक्त केले. देशातील महान लोकांनी ऐतिहासिक संघर्ष करून स्वातंत्र्य आणि घटना मिळविली आहे. ज्यांनी घटना तयार केली, ज्यांचा घटनेवर विश्वास आहे तेच केवळ घटनेचे रक्षण करतील, असेही प्रियांका यांनी 'एक्स'वर म्हटले आहे.
ज्यांनी घटनेची अंमलबजावणी करण्यास विरोध केला, घटनेचा फेरविचार करण्यासाठी आयोग नेमला, घटना रद्द करण्याचे आवाहन केले, सातत्याने घटनेवर आणि लोकशाहीच्या आत्म्यावर आपल्या कृतीने आणि निर्णयाने हल्ला केला ते आता संविधान हत्या दिन पाळण्याचे नकारात्मक राजकारण करीत असून त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे, असा सवाल प्रियांका गांधी-वढेरा यांनी केला.