
नवी दिल्ली : सदोष रस्ते बांधकाम करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा आणि रस्ते कंत्राटदार आणि अभियंत्यांना अपघातांसाठी जबाबदार धरून शिक्षा करावी, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली.
‘सीआयआय’ या औद्योगिक संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, “भारत हा जगात रस्ते अपघातात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळेच सदोष रस्तेबांधणी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात यावा. तसेच रस्ते कंत्राटदार आणि अभियंत्यांना अपघातांसाठी जबाबदार धरून तुरुंगात पाठवण्यात यावे.”
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने २०३० पर्यंत रस्ते अपघात निम्म्यावर आणण्याचे ध्येय बाळगले आहे. गडकरी यांच्या मते, “रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २०२३मध्ये जवळपास पाच लाख रस्ते अपघात झाले, त्यात १ लाख ७२ हजार लोकांना जीव गमवावा लागला. या अपघातात ६६.४ टक्के म्हणजेच १ लाख १४ हजार मृत्यूंमध्ये १८ ते ४५ वर्षीय तरुण-तरुणींचा समावेश होता. तसेच त्यात १० हजार बालकांनाही आपला जीव गमवावा लागला. त्यात ५५ हजार मृत्यू हे हेल्मेट परिधान न केल्यामुळे झालेले आहेत, तर ३० हजार मृत्यू हे सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे झाले आहेत.”
“रस्ते वाहतूक मंत्रालयाद्वारे महामार्गांवरील अपघातकेंद्र निश्चित करण्यासाठी जवळपास ४० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे देशात चालकांची तीव्र कमतरता दूर करण्यासाठी चालक प्रशिक्षण आणि फिटनेस केंद्रे स्थापन करण्यात यावीत. यासाठी उद्योजक आणि इतर भागधारकांना सरकारसोबत भागीदारी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपले ट्रकचालक १५-१८ तास ड्रायव्हिंग करतात
रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी भारतातील ट्रकमध्ये चालकांना थकवा आला किंवा झोप आली तर त्याचा शोध घेणारी उपकरणे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर अनेक देशांमध्ये, आठ तास गाडी चालवल्यानंतर चालक खाली उतरतात. मात्र, भारतातील काही ट्रकचालक १५ ते १८ तास न थकता, न थांबता गाडी चालवतात. त्यामुळे रस्ते सुरक्षेच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष न करता, वाहनचालकांच्या थकव्याबद्दल संवेदनशील राहण्याची गरज आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.