नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भाग कोणत्याही लढाई, युद्ध किंवा आक्रमणाशिवाय आपोआप भारतात परत येईल, पीओकेचे लोक स्वतः स्वातंत्र्याची मागणी करत आहेत आणि एक दिवस आम्हीही भारतवासी आहोत असे तेच म्हणतील, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. राजनाथ सिंह मोरक्को दौऱ्यावर असून, येथील भारतीयांशी संवाद साधताना पीओकेबाबत विधान केले.
राजनाथसिंह म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सीडीएस, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांना विचारले होते की, जर सरकारने आदेश दिला तर सैन्य तयार आहे का, त्यावर एका क्षणाचाही विलंब न करता, त्यांनी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींनी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि तुम्ही परिणाम पाहिला. सीमेवर नव्हे तर १०० किलोमीटर आत दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले. जैश-ए-मोहम्मदचा एक प्रमुख दहशतवादी म्हणत होता की, भारताने मसूद अझहरच्या कुटुंबाचा नाश केला आहे. दहशतवादी त्यांचा धर्म विचारून मारतात, पण भारताने त्यांच्या धर्माकडे पाहिले नाही, त्यांची वाईट कृत्ये पाहूनच उत्तर दिले, असे राजनाथ म्हणाले.
'तो' दिवस दूर नाही
पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात येईल. त्या भागात राहणाऱ्या लोकांमधून आता तशी मागणी होत आहे. तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांच्या घोषणा ऐकल्या असतील. पाच वर्षांपूर्वी मी भारतीय लष्कराच्या एका कार्यक्रमासाठी काश्मीर खोऱ्यात गेलो होतो. त्या कार्यक्रमावेळी भाषण करत असताना मी म्हटले होते की, पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करून त्यावर ताबा मिळवण्याची गरज नाही. मुळात तो भाग आपलाच आहे आणि तो लवकरच भारतात समाविष्ट होईल. एक दिवस पीओके स्वतःच म्हणेल, मी सुद्धा भारत आहे. तो दिवस फार दूर नाही, असे त्यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूर पार्ट २,३ बाकी
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. ते स्थगित करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी आहे, असे सांगत राजनाथसिंह यांनी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला. पाकिस्तानने शस्त्रसंधी करण्याची विनंती केली आणि भारताने ती स्वीकारली. आम्हाला चांगले संबंध हवे आहेत. कारण अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे की, मित्र बदलले जाऊ शकतात पण, शेजारी नाही. आम्ही त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पंतप्रधानांनीही म्हटले आहे की, एक अल्पविराम आहे. ऑपरेशन सिंदूर तूर्तास स्थगित केलेले आहे, ते पुन्हा सुरू केले जाऊ शकते, असे राजनाथ सिंह म्हणाले.