
दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केलेल्या घोषणेनुसार, उद्यापासून राष्ट्रीय राजधानीतील सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यांनी असेही सांगितले की, इयत्ता ५ वी आणि त्यावरील विद्यार्थ्यांसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व बाह्य उपक्रम व मैदानी उपक्रम थांबवले जातील. दिल्लीतील AQI पातळी (Air Quality Index) ‘गंभीर’ चिन्हावर पोहोचल्याने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडून ही घोषणा आली आहे.
हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ श्रेणीत घसरल्याने दिल्लीवर दाट धुके पसरले आहे. राजधानी दिल्ली (Delhi) शहर आणि आजूबाजूच्या परिसराला घातक धुक्याने व्यापले असल्याने रहिवाशांना श्वास घेणे कठीण झाले आहे. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी बिघडत असताना, केंद्राने ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) स्टेज IV अंतर्गत दिल्ली-एनसीआरमध्ये प्रतिबंध लागू केले. GRAP स्टेज IV योजनेचा भाग म्हणून या प्रदेशात डिझेल वाहनांवर बंदी, बांधकाम उपक्रम आणि इतर काही निर्बंध लावण्यात आले आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नमूद केले की, खालावत असलेली हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण पातळी ही संपूर्ण उत्तर भारताची समस्या आहे आणि त्यावर उपाय म्हणून केंद्राने पावले उचलायला हवीत. “ही वेळ दोषारोपाची आणि राजकारणाची नाही, तर समस्येवर तोडगा काढण्याची वेळ आहे. केजरीवाल किंवा पंजाब सरकारला दोष देऊन काही फायदा होणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.