दिल्ली विमानतळावर 'ट्रॅफिक जाम'; ३०० हून अधिक विमानांना विलंब; हवाई नियंत्रण कक्ष यंत्रणेत बिघाड

देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतूक ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम’मध्ये झालेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे मंदावली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे ३०० हून अधिक विमानांना विलंब झाला आहे, ज्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
दिल्ली विमानतळावर 'ट्रॅफिक जाम'
दिल्ली विमानतळावर 'ट्रॅफिक जाम'पीटीआय
Published on

नवी दिल्ली : देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतूक ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम’मध्ये झालेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे मंदावली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे ३०० हून अधिक विमानांना विलंब झाला आहे, ज्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

हा तांत्रिक बिघाड ‘ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टीम’मध्ये झाला आहे. ही सिस्टीम अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती ‘एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स’ वापरत असलेल्या ऑटो ट्रॅक सिस्टीमला ऑटोमॅटिक फ्लाइट प्लॅनसह आवश्यक डेटा पुरवते. ‘ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टीम’ निकामी झाल्यामुळे, कंट्रोलर्सना आता फ्लाइट प्लॅन मॅन्युअली तयार करावे लागत आहेत, ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने हवाई वाहतुकीत मोठी गर्दी झाली आहे आणि विलंब वाढत आहे. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, दिल्ली विमानतळावर विमानांच्या उड्डाणांना सुमारे ५० मिनिटांचा विलंब होत आहे.

विमान कंपन्यांची सूचना

या तांत्रिक समस्येचा परिणाम तातडीने विमान कंपन्यांवर जाणवला. इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट आणि अकासा एअर यांसारख्या प्रमुख कंपन्यांनी प्रवाशांसाठी सूचना जारी करून दिल्लीतील एटीसी बिघाडामुळे त्यांच्या विमानांवर परिणाम झाल्याची पुष्टी केली आहे. दिल्लीच्या धावपट्टीवर पार्किंगची जागा अपुरी असल्याने विमान कंपन्यांना काही विमानांची उड्डाणे रद्द करावी लागण्याची शक्यता आहे.

विमानतळ प्राधिकरणाचे स्पष्टीकरण

‘एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया’ने सोशल मीडिया पोस्टद्वारे या समस्येची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, दिल्ली विमानतळावरील फ्लाइट ऑपरेशनमध्ये ‘ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टीम’मध्ये तांत्रिक समस्या आल्यामुळे विलंब होत आहे. ‘दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’ने देखील परिस्थितीची गंभीर दखल घेत फ्लाइट ऑपरेशनमध्ये विलंब होत असल्याची कबुली दिली आणि सांगितले की, त्यांची टीम ही समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.

प्रवाशांचे हाल आणि उपाययोजना

दिल्ली विमानतळ दररोज १,५०० हून अधिक विमानांचे व्यवस्थापन करते. सिस्टीम फेल झाल्यावर एवढ्या मोठ्या ट्रॅफिकचे मॅन्युअल व्यवस्थापन करताना कंट्रोलर्सवर मोठा ताण आला आहे. एअर इंडिया आणि स्पाइसजेटसह इतर एअरलाइन्सने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि प्रवाशांना मदतीसाठी क्रू आणि ग्राउंड स्टाफ तैनात केले आहेत. त्यांनी प्रवाशांना त्यांच्या विमानाचा स्टेटस तपासूनच विमानतळावर येण्याचे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in