
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने गुरुवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसऐवजी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.
खासदार अनिल देसाई म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) पक्षाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आपल्या पक्षाने 'आप'ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ला पाठिंबा जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर लगेच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.