
नवी दिल्ली : दिल्ली दंगलीतील आरोपी आणि ‘एआयएमआयएम’चे उमेदवार ताहिर हुसेन याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी कोठडी पॅरोल मंजूर केला आहे. याअंतर्गत, हुसेनला २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत दिवसातून १२ तास तुरुंगाबाहेर राहण्याची परवानगी असेल, मात्र रात्री त्याला पुन्हा तुरुंगात परतावे लागेल.
ताहिर हुसेनला सहा दिवसांचा कोठडी पॅरोल मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटीही घातल्या आहेत. तुरुंगातून बाहेर पडताना दोन पोलीस, तुरुंगातील व्हॅन आणि एस्कॉर्ट वाहनाच्या सुरक्षेचा खर्च करावा लागेल. यासाठी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची आगाऊ रक्कम (२ लाख रुपये) देण्याचे आदेश दिले. ताहिर हुसेन हा ‘एमआयएम’ पक्षाकडून मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. या काळात त्याला पक्षाच्या कार्यालयात जाण्याची तसेच मतदारसंघामध्ये सभा घेण्याची परवानगी असेल. मात्र, त्याला घरी जाता येणार नाही.