
नवी दिल्ली : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक मंगळवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले. त्यानुसार दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे.
दिल्ली विधानसभेचे एकूण संख्याबळ ७० असून विद्यमान विधानसभेची मुदत २३ फेब्रुवारीला संपुष्टात येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची तारीख १७ जानेवारी २०२५ असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २० जानेवारी आहे. उमेदवारी अर्जांची छाननी २८ जानेवारीला होणार असून, मतदान ५ फेब्रुवारीला होणार आहे, तर निकाल ८ फेब्रुवारीला जाहीर केले जाणार आहेत.
तिरंगी लढत
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप, काँग्रेस आणि भाजप अशी प्रामुख्याने तिरंगी लढत होणार आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीतून निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपचे प्रवेश वर्मा यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे झाले आहेत. काँग्रेसचे अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख देशद्रोही असा केला होता. त्यानंतर या प्रकरणावरून दिल्लीचे राजकारण तापले होते. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या ‘शीश महल’वरून मोदी आणि अमित शहा हे सातत्याने केजरीवालांवर टीका करीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार, याची उत्सुकता असेल. दिल्ली विधानसभेची निवडणूक ‘आप’ने सलग दोन वेळा जिंकली आहे. कोणत्याही स्थितीत भाजपला ‘दिल्ली’ काबीज करायची आहे. त्यामुळे भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
हॅकिंगचा पुरावा नाही
ईव्हीएममध्ये कोणत्याही त्रुटीचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग असण्याचा तसेच मतमोजणीमध्ये काही छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. देशातील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने हेच सांगितले आहे की, ईव्हीएम टेम्परिंगचे आरोप निराधार आहेत. लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान खोटे मतदार जोडल्याचा आणि मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाचनंतर मतदानाची टक्केवारी वाढवल्याचे खोटे आरोप करण्यात आल्याचे ते म्हणाले. मतदारांच्या आकडेवारीत फेरफार करणे अशक्य आहे. कारण मतदानाच्या अंतिम टक्केवारीची मतदानाच्या दिवशीच्या सायंकाळी पाच वाजताच्या आकडेवारीशी तुलना करणे दिशाभूल करणारे आहे. मतदानाची वेळ संपण्याच्या काही वेळ आधी मतदान अधिकाऱ्यांना अनेक कामे पार पडावी लागतात. त्याचबरोबर ‘फॉर्म १७ सी’ मतदान केंद्रांवर मतदान संपल्यावर मतदान प्रतिनिधींना दिले जाते. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत फेरफार केल्याच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही, असे ते म्हणाले.
केंद्रीय अर्थमंत्र्यांना सूचना
दरम्यान, दिल्लीत निवडणूक असल्याने दिल्लीकेंद्रित कोणतीही घोषणा, तरतूद केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नसावी, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून तशा आशयाचे पत्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठविले आहे. दिल्ली निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आलेला असतानाच १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
ईव्हीएम, मतदार याद्यांमधील घोळाचे आरोप ‘ईसी’ने फेटाळले
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना राजीव कुमार यांनी, ईव्हीएममधील छेडछाड, मतदार याद्यांमधील घोळ आणि वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेवटच्या पाच तासांत मतदानाची टक्केवारी कशी वाढली याबाबतही स्पष्टीकरण दिले.
राजीव कुमार यांची शेरोशायरी
यावेळी राजीव कुमार यांनी शायरीच्या माध्यमातून ईव्हीएमवरील आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, ‘आरोप और इल्जामात का दौर चले, कोई गिला नहीं, झूठ के गुब्बारों को बुलंदी मिलें, कोई शिकवा नहीं, हर परिणाम में प्रमाण देते है, पर वो विना सबूत शक की नई दुनिया रौनक करते हैं और शक का इलाज तो हकीम लुकमान के पास भी नहीं!’
उद्धव यांना खडे बोल
राजीव कुमार यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. आरोप करताना हवेत गोळीबार करण्याची गरज नाही. तुम्ही पुरावा दाखवा, या ठिकाणी असे घडून येत आहे, हे सांगा आम्ही कारवाई करू. महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान एक हल्ला पाहण्यास मिळाला. तो म्हणजे आमचे हेलिकॉप्टर तपासत आहात, त्यांचे का नाही तपासले? यांचे का नाही तपासले, घाणेरड्या भाषेचा उपयोगही केला गेला. आम्ही उत्तर दिले नाही, संयम ठेवला. मतदानाच्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना धमक्या देण्यापर्यंत काहींची मजल गेली. मात्र आम्ही शांत बसलो, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले.