Delhi car blast: दहशतवाद्यांना बाबरीचा बदला घ्यायचा होता; देशभरात ३२ कारमध्ये स्फोट घडवण्याचा होता कट; तपासातून माहिती उघड

दहशतवाद्यांना लाल किल्ला आणि इतर ठिकाणी स्फोट घडवायचे होते आणि ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद पाडली गेली, त्याचा बदला घ्यायचा होता. ३२ कारमध्ये बॉम्ब आणि स्फोटके ठेवून देशभरात स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती चौकशीतून समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
Delhi car blast:  दहशतवाद्यांना बाबरीचा बदला घ्यायचा होता; देशभरात ३२ कारमध्ये स्फोट घडवण्याचा होता कट; तपासातून माहिती उघड
Published on

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर नवनवीन माहिती उघडकीस येत आहे. १० नोव्हेंबरला स्फोट झाला, त्याआधी फरिदाबाद येथून २९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. दहशतवाद्यांना लाल किल्ला आणि इतर ठिकाणी स्फोट घडवायचे होते आणि ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद पाडली गेली, त्याचा बदला घ्यायचा होता. ३२ कारमध्ये बॉम्ब आणि स्फोटके ठेवून देशभरात स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती चौकशीतून समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

“१६ व्या शतकात बाबरी मशीद ही रामजन्मभूमीच्या जागेवर उभी राहिली आहे, असा दावा होत होता. या वादानंतर ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली. त्यानंतर झालेल्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यात राम मंदिराच्या बाजूने निकाल लागला आणि २०२० मध्ये राम मंदिराचे काम सुरू झाले. बाबरी मशीद पाडली गेल्याचा बदला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला घ्यायचा होता. त्यामुळे त्यांनी दहशतवाद्यांचे ‘व्हाईट कॉलर मॉड्यूल’ उभे केले. या मॉड्यूलमध्ये डॉक्टर, प्रोफेसर आणि महिलांचा समावेश होता. डॉक्टरांचे हे मॉड्यूल दिल्लीत लाल किल्ल्यासह सहा ठिकाणी स्फोट घडवणार होते, अशीही माहिती समोर आली आहे,”असे पोलिसांनी सांगितले.

‘जैश-ए-मोहम्मद’चे दहशतवादी बाबरी प्रकरणाचा बदला घेण्याच्या तयारीत होते. स्फोट घडवून आणण्यासाठी डॉ. मुझम्मील, डॉ. आदिल, डॉ. उमर आणि डॉ. शाहीन यांनी ३० लाख रुपये जमवले होते. स्फोटके बनवण्यासाठी हरयाणातील नूह व गुरुग्राम येथून साहित्य जमा करण्यात आले. त्यानुसार ६ आणि ७ डिसेंबरला स्फोट घडवून आणायचे होते, अशा गोष्टींची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हरयाणामध्ये तिसरी संशयित कार सापडली

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कार स्फोट घडवणारा दहशतवादी डॉ. उमर उन नबी याच्या मालकीच्या इको स्पोर्ट्स कारच्या फॉरेन्सिक चाचणीत काही सुगावे सापडले आहेत. त्यानुसार पोलिसांनी फरीदाबाद येथून या मॉड्यूलशी जोडलेली तिसरी ब्रिझा कार जप्त केली आहे. अल-फलाह विद्यापीठात जप्त करण्यात आलेली ही कार महिला दहशतवादी डॉ. शाहीनच्या नावावर असल्याची माहिती आहे. हरयाणा पोलिसांचे बॉम्बशोध पथक या कारची चौकशी करत आहे. या प्रकरणाशी संबंधित चौथ्या स्विफ्ट डिझायर कारचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

आता ईडीच्या रडारवर अल फलाह विद्यापीठ

डॉक्टरांनी स्फोटके खरेदी करण्यासाठी २३ लाख रुपये कुठून जमवले याची सक्तवसुली संचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे. ईडी आता अल फलाह विद्यापीठाच्या व्यवहारांचीही चौकशी करेल. तसेच इतर तपास यंत्रणाही दहशतवादी निधीपुरवठा आणि पैशांचे झालेले व्यवहार शोधण्याचे काम करत आहेत. विद्यापीठाच्या खात्यांची आणि संबंधित संस्थांची तपासणी केल्यास दहशतवादी मॉड्यूलच्या निधीपुरवठ्याबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रत्येक काश्मीरी मुस्लीम हा दहशतवादी नाही -उमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक मुस्लीम व्यक्ती ही दहशतवादी नाही आणि प्रत्येक काश्मीरी मुसलमान दहशतवाद्यांच्या बाजूने नाही. या घटनेची जितका निषेध व्यक्त केला जाईल तितका तो कमी आहे. निरपराध लोकांची अशाप्रकारे निर्घृणपणे हत्या कोणत्याही धर्मात किंवा विचारसरणीत मान्य नाही. दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, पण त्याचबरोबर निर्दोष लोकांना या कारवाईत ओढले जाऊ नये. दोषींना शिक्षा व्हायलाच हवी, पण निरपराधांना वाचवणे ही सरकारची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.

काश्मिरात ५०० ठिकाणी छापे, ६०० जण ताब्यात

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाचे धागे जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचले असून जम्मू-काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत ५०० ठिकाणी छापेमारी करून सुमारे ६०० जणांना ताब्यात घेतले आहे. श्रीनगर, कुलगाम, पुलवामा, शोपियां आणि बारामुला या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान तीन सरकारी कर्मचारी आणि इतर सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in