केजरीवाल यांचा कोठडीतून दुसरा आदेश

गेल्या आठवड्यात केजरीवाल यांनी कोठडीतूनच पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्याबाबतचे आदेश दिले होते. मात्र, कोठडीत असताना केजरीवाल आदेश देऊ शकतात की नाही, याची कायदेशीर खातरजमा करण्यात येत आहे, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीतून दुसरा आदेश जारी केला. सर्व सरकारी रुग्णालये आणि मोहल्ला दवाखान्यांमधून रुग्णांना औषधांचा मोफत पुरवठा, आरोग्यविषयक चाचण्या योग्य प्रकारे व्हाव्यात याची दक्षता घ्यावी, असा आदेश केजरीवाल यांनी दिल्याचे दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले.

मोहल्ला दवाखान्यातील प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये समस्या भेडसावत असल्याची माहिती केजरीवाल यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी वरील आदेश दिले, असे भारद्वाज यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले. केजरीवाल यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत, असेही ते म्हणाले.

स्वत: कोठडीत असूनही केजरीवाल यांना दिल्लीतील जनतेची किती काळजी आहे हे त्यांनी दिलेल्या आदेशावरून स्पष्ट होत आहे. गेल्या आठवड्यात केजरीवाल यांनी कोठडीतूनच पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्याबाबतचे आदेश दिले होते. मात्र, कोठडीत असताना केजरीवाल आदेश देऊ शकतात की नाही, याची कायदेशीर खातरजमा करण्यात येत आहे, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

दिल्ली विधानसभेचे आज अधिवेशन

बुधवारी दिल्ली विधानसभेचे अधिवेशन बोलाविण्यात आले आहे, असे सौरभ भारद्वाज यांनी मंगळवारी सायंकाळी सांगितले. मोफत औषधे आणि चाचण्या याबाबतची स्थिती काय आहे, त्याची माहिती देण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. काही त्रुटी असल्यास त्या सुधारण्यासाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्यासही सांगण्यात आले आहे, असे भारद्वाज म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in