
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची सीबीआय चौकशी होणार आहे. मद्य घोटाळ्याप्रकरणी त्यांची सीबीआयकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांना १६ एप्रिलला सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. दिल्लीत उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सुरु केलेले नवे मद्य धोरण हे त्यांच्या अटकेचे कारण असल्याचे सांगितले जात आहेत. या धोरणावरुन मनीष सिसोदिया यांची यापूर्वीही अनेकदा चौकशी झालेली आहे. त्यानंतर सीबीआयने उपमुख्यमंत्री सिसोदिया चौकशीत सहकार्य करत नसल्याचे कारण दिले आणि त्यांना अटक केली आहे.
दरम्यान, मागच्या वर्षी जुलैमध्ये दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे एक अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये मनीष सिसोदियांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. मद्य परवाना देताना त्याऐवजी कमिशन घेतले गेले. त्यानंतर हा पैसा आपने पंजाब विधानसभा निवडणुकीत वापरला, असा गंभीर आरोप मनीष सिसोदियांवर करण्यात आला. यानंतर ईडी आणि सीबीआयने प्रकरणाची चौकशी करण्यात सुरुवात केली.