नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घेतलेल्या शासकीय बैठकीत त्यांचे पती मनीष गुप्ता यांच्या उपस्थितीवरून राजधानीत नवा राजकीय वाद उफाळला आहे. विरोधी पक्ष आम आदमी पार्टीने (आप) या प्रकाराला प्रसिद्ध वेब सिरीज ‘पंचायत’मधील ‘फुलेरा गाव’च्या कारभाराची उपमा देत भाजपच्या कारभाराची खिल्ली उडवली आहे. ‘आप’ने यापूर्वीही अनेकवेळा मनीष गुप्ता यांच्या सरकारी कामकाजातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
देशातील अनेक गावांमध्ये महिला सरपंच आहेत. कारण तेथे महिलांसाठी सरपंचपद आरक्षित असते. मात्र, वास्तवात सरपंच महिलेचे पतीच गावाची व्यवस्था पाहतात. पत्नीच्यावतीने निर्णय घेतात. ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’वरील ‘पंचायत’ या वेब सिरीजमध्ये नेमके याचेच चित्रण आहे. या सिरीजमध्ये मंजू देवी (नीना गुप्ता) सरपंच असली तरी तिचे पतीच सरपंच म्हणून काम पाहतात. ही वेब सिरीज प्रचंड गाजली आहे. त्याचा आधार घेत आम आदमी पार्टीने रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता यांच्या शासकीय बैठकीतील उपस्थितीवर टीका केली आहे.
यापूर्वीही होता आरोप
एप्रिल महिन्यातही असाच वाद झाला होता, जेव्हा माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी मनीष गुप्ता हे ‘दिल्ली सरकार चालवत आहेत’ असा आरोप केला होता. मनीष गुप्ता हे महापालिका, दिल्ली जल बोर्ड, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत दिसल्याचे सांगत ‘आप’ नेत्या आतिशी यांनी रेखा गुप्ता यांच्या प्रशासकीय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजपने त्यावेळी मनीष गुप्ता यांच्या उपस्थितीचा बचाव करत, ते सरकारी नाही तर पक्षाच्या बैठकीत सहभागी झाले होते, असे स्पष्ट केले होते. यानंतरही ‘आप’ आणि काँग्रेसने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे सुरूच ठेवले आहे. ‘आप’चे खासदार संजय सिंग यांनी तर दिल्लीत ‘दोन मुख्यमंत्री’ असल्याचा आरोप केला आहे.
मनीष गुप्ता कोण?
रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता हे दिल्लीतील व्यावसायिक तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत. रेखा गुप्ता यांच्या २०२५ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, मनीष गुप्ता यांची ‘निकुंज एंटरप्राइजेस’ नावाची एक कंपनी आहे. या कंपनीचे नाव त्यांच्या मुलाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, मनीष गुप्ता हे एका खासगी विमान कंपनीचे असोसिएट म्हणूनही काम करतात. त्यांचे उत्पन्न ‘व्यवसाय, पगार, शेअर ट्रेडिंग, व्याज आणि कमिशन’मधून मिळते. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी त्यांचे एकूण उत्पन्न रु. ९७ लाख जाहीर करण्यात आले होते. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या जवळ रु. १५.७ लाख रोख रक्कम असून, त्यांनी रोखे, डिबेंचर्स, एनपीएस आणि एलआयसी पॉलिसींमध्ये गुंतवणूक केली आहे.