
दिल्लीमध्ये तब्बल 27 वर्षांनी भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार भाजप 48 जागांवर आघाडीवर असून 'आप'ला 22 जागांपर्यंतच आघाडी मिळवता आली आहे. 70 जागा असणाऱ्या दिल्ली विधानसभेत सरकार स्थापनेसाठी 36 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे आकडेवारीवरून भाजपने बहुमत गाठल्याचे दिसून येत आहे. निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याची जोरदार चर्चा रंगली आहे.
राजकीय वर्तुळात भाजपचा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याविषयी सुरू असलेल्या चर्चांमध्ये प्रवेश सिंग (वर्मा), दुष्यंत गौतम यांची नावे प्रामुख्याने आघाडीवर आहेत.
कोण आहेत प्रवेश सिंग (वर्मा)?
दिल्ली भाजपच्या मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात जास्त प्रवेश सिंग (वर्मा) यांच्या नावाची चर्चा आहे. दिल्ली निवडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सरळ टक्कर देत त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांना 'जायंट किलर' म्हणले जात आहे. ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. दिल्लीत जाट आरक्षणाचा मोठा प्रश्न आहे. प्रवेश सिंग (वर्मा) हे जाट समुदायतून येतात. त्यामुळे देखील त्यांच्या नावाचा विचार प्रामुख्याने केला जात आहे. तसेच जाट आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रवेश सिंग (वर्मा) यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका देखील केली होती.
प्रवेश सिंग (वर्मा) यांचा जन्म 1977 मध्ये झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण आर के पूरम येथील दिल्ली पब्लिक स्कूल येथून घेतले. नंतर दिल्ली विद्यापीठाच्या किरोरीमल कॉलेजमधून कला विषयात पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले. त्यांनी 2013 पासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
हरिश खुराणांच्या नावाची चर्चा
मुख्यमंत्रिपदासाठी हरिश खुराणा यांचेही नाव चर्चेत आहे. ते भाजपचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे पूत्र आहेत. मोतीनगर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी आपच्या शिवचरण गोएल यांचा पराभव केला आहे.
दुष्यंत गौतम आणि रमेश बिधुरी यांचंही नाव चर्चेत?
दिल्ली मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दुष्यंत गौतम यांच्या नावाचीही चर्चा आहे. दुष्यंत गौतम हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असून ते माजी राज्यसभेचे माजी खासदार आहेत. ते करोलबाग येथून भाजपचे उमेदवार आहेत. मात्र, आप उमेदवार विशेष रावी यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून मागे पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याच प्रमाणे गुज्जर समुदायातून आलेले रमेश बिधुरी यांचेही नाव चर्चेत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी आपवर जोरदार हल्ला चढवला होता. मात्र त्यांना देखील कलकाजी येथून मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भाजप मनोज तिवारी यांना दिल्लीच्या राजकारणात उतरवणार?
दिल्ली निवडणुकीपूर्वी भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला नव्हता. यावरून आपने भाजपला घेरले होते. यावेळी आपला उत्तर देताना भाजप नेते मनोज तिवारी म्हणाले होते भाजप धोरण आणि दृढनिश्चयाच्या जोरावर निवडणूक लढवत आहे. तसेच त्यांनी त्यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका देखील केली होती. त्यानंतर भाजप मनोज तिवारी यांनी दिल्लीच्या राजकारणात उतरवू शकते यासह ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात, अशी चर्चा निवडणुकीपूर्वी रंगली होती. मनोज तिवारी यांना याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी याविषयी काही स्पष्ट उत्तर दिले नव्हते. मात्र दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असा विश्वास व्यक्त केला होता.