
दिल्ली निवडणुकीत विजयानंतर भाजपचे प्रवेश सिंग (वर्मा) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा गाठला असून दिल्लीत भाजपचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. त्यानंतर दिल्ली मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यामध्ये प्रवेश सिंग (वर्मा) यांचे नाव आघाडीवर आहे.
दिल्लीकरांना गर्व होईल अशी राजधानी बनवायचे आहे
त्यांनी यावेळी दिल्लीच्या विकासाबाबत त्यांचे काय Vision आहेत याविषयी देखील माहिती दिली. यावेळी ते म्हणाले दिल्लीकरांना गर्व होईल अशी राजधानी बनवायची आहे. आम्ही महिलांना 2500 रुपये देण्याचे वचन दिले होते, भ्रष्टाचाराविरुद्ध एसआयटी गठित करणे, दिल्लीचे प्रदूषण कमी करणे, वाहतूकीच्या प्रश्नावर काम करणे, दिल्लीला सुंदर बनवणे जगातील इतर राजधानीच्या शहरांप्रमाणे दिल्लीचा देखील विकास करणे ही आमची प्राथमिकता असणार आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?
यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता ते म्हणाले, ''मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय वरिष्ठ घेतील. पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील सर्वांना मान्य असेल, असे प्रवेश सिंग वर्मा यांनी म्हटले आहे.'' तसेच यावेळी त्यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना देखील धन्यवाद दिले.
प्रवेश सिंग (वर्मा) यांच्याविषयी...
प्रवेश सिंग (वर्मा) हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते साहिब सिंग वर्मा यांचे पूत्र आहेत. प्रवेश सिंग (वर्मा) यांचा जन्म 1977 मध्ये झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण आर के पूरम येथील दिल्ली पब्लिक स्कूल येथून घेतले. नंतर दिल्ली विद्यापीठाच्या किरोरीमल कॉलेजमधून कला विषयात पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले.
प्रवेश सिंग (वर्मा) यांची राजकीय कारकीर्द...
त्यांनी 2013 मधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांनी पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघ जिंकला आणि त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी "केजरीवाल हटवा, राष्ट्र वाचवा" ही मोहीम सुरू केली आणि आप प्रशासनावर खोटी आश्वासने दिल्याबद्दल टीका केली. दिल्ली निवडणुकीत आज त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यानंतर त्यांना जाएंट किलर म्हणून संबोधले जात आहे.