बिहारच्या चार गँगस्टरचे दिल्लीत एन्काऊंटर

बुधवारी मध्यरात्री २ वाजून २० मिनिटांनी रोहिणी येथील डॉ. आंबेडकर चौक ते पंसाली चौकदरम्यान ही चकमक सुरू होती. दोन्ही बाजूने तुफान गोळीबार झाला. यावेळी चारही गँगस्टर पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले.
पीटीआय
पीटीआय
Published on

नवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राजधानी दिल्लीमध्ये बिहारच्या चार कुख्यात गँगस्टरचे एन्काऊंटर करण्यात आले. बुधवारी मध्यरात्री रोहिणी येथे ही चकमक झाली. यात रंजन पाठक टोळीतील चार जण ठार झाले. दिल्ली पोलीस आणि बिहार पोलिसांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली. विधानसभा निवडणुकीमध्ये दहशत पसरवण्याचा कट या सर्वांनी रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. बिहारमधील अनेक खून प्रकरणात सहभागी असलेली रंजन पाठक टोळी विधानसभा निवडणुकीवेळी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. ही टोळी दिल्लीत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि बिहार पोलिसांनी या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचला. रोहिणी भागामध्ये पोलिसांनी या टोळीला घेराव घातला. यावेळी पोलीस आणि रंजन पाठक टोळीमध्ये चकमक उडाली.

बुधवारी मध्यरात्री २ वाजून २० मिनिटांनी रोहिणी येथील डॉ. आंबेडकर चौक ते पंसाली चौकदरम्यान ही चकमक सुरू होती. दोन्ही बाजूने तुफान गोळीबार झाला. यावेळी चारही गँगस्टर पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले. त्यांना रोहिणी येथील डॉ. बीएसए रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस चकमकीमध्ये ठार झालेल्या गँगस्टरची ओळख पटली आहे. रंजन पाठक (२५), बिमलेश महतो उर्फ बिमलेश साहनी (२५), मनीष पाठक (३३, तिघे राहणार सीतामढी, बिहार) आणि अमन ठाकूर (२१, रा. शेरपूर, करावल नगर, दिल्ली) अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्यावर खून, खंडणीसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होती.

logo
marathi.freepressjournal.in