दिल्लीत भीषण आगीत ९ जणांचा मृत्यू

दिल्लीतील पालम परिसररातील एका चार मजली इमारतीत बुधवारी (दि. १८) सकाळी लागलेल्या भीषण आगीत आगीत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये तीन लहान मुलींचाही समावेश आहे.
दिल्लीत भीषण आगीत ९ जणांचा मृत्यू
दिल्लीत भीषण आगीत ९ जणांचा मृत्यूX | PTI
Published on

नवी दिल्ली: दिल्लीतील पालम परिसररातील एका चार मजली इमारतीत बुधवारी (दि. १८) सकाळी लागलेल्या भीषण आगीत आगीत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये तीन लहान मुलींचाही समावेश आहे. या आगीत कुटुंबातील इतर अनेक सदस्य गंभीर होरपळले असून, त्यांच्यावर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

या चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर कपड्यांचे दुकान होते, तर दुसऱ्या मजल्याचा वापर गोदामासाठी केला जात असे. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर १५ जणांचे एक कुटुंब राहत होते. राजेंद्र कश्यप हे दुकानाचे मालक असून ते घटनेच्या वेळी दिल्लीबाहेर होते. या इमारतीतून बाहेर पडण्यासाठी केवळ एकच मार्ग उपलब्ध असल्याने बाहेर पडण्याचे अन्य कोणतेही मार्ग नव्हते. आग भडकल्यानंतर, दोन व्यक्तींनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव वाचवला. त्यापैकी एका तरुणीला उडी मारल्यामुळे हाडांना दुखापत झाली आहे.

१० जणांना सुखरूप काढले बाहेर

आग इतक्या वेगाने पसरली की, वरील मजल्यांवर राहणाऱ्या कुटुंबाला बाहेर निघण्याची संधीही मिळाली नाही. पोलीस आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने, ढिगाऱ्यातून आणि धुराच्या लोटातून एकूण १० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले, परंतु दुर्दैवाने, द्वारका येथील मणिपाल रुग्णालयात आणलेल्या सहा व्यक्तींना तेथे मृत घोषित करण्यात आले. मृतांमध्ये प्रवेश (३५), कमल (४०), आशु (३२) आणि तीन लहान मुलींचा (वय १२, ६ आणि ५) समावेश आहे.

या घटनेनंतर, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी घटनास्थळी न्यायवैद्यक प्रयोगशाळा पथकाला बोलावण्यात आले. प्राथमिक निरीक्षणांवरून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे दिसून येत असले, तरी शोरूममध्ये साठवून ठेवलेली ज्वलनशील सौंदर्यप्रसाधने आणि कपडे यांनी लवकर पेट घेतला.

logo
marathi.freepressjournal.in