देवी-देवतांच्या नावे मते; मोदींना निवडणूक लढण्यास अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळली

देवी, देवतांच्या नावावर मते मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : देवी, देवतांच्या नावावर मते मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. अनेक कारणांमुळे संबंधित याचिका पूर्णपणे चुकीची असल्याचे न्या. सचिन दत्ता यांनी यावेळी स्पष्ट केले.

याचिकाकर्ते वकील आनंद एस. जोंधळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर निवडणूक बंदीची मागणी केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत हायकोर्टाने म्हटले आहे की, आचारसंहितेचा भंग झाला असे याचिकाकर्त्याचे मत आहे, परंतु निवडणूक आयोगाला कोणत्याही तक्रारीवर विशेष विचार करण्याचे निर्देश देणे आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. मात्र, जोंधळे यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोग कायद्यानुसार कारवाई करू शकते.

पंतप्रधान मोदी देव आणि मंदिरांच्या नावावर लोकांकडून मते मागत आहेत. पंतप्रधानांनी ९ एप्रिलला यूपीच्या पिलीभीत येथे केलेल्या भाषणात हिंदू देव-देवता आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांच्या नावाने मते मागितली, असा आरोप ॲड. जोंधळे यांनी आपल्या याचिकेत केला होता.

आयोगाकडूनही कारवाई नाही

मोदींविरुद्ध आपण निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली होती आणि आयपीसीच्या कलम ‘१५३ ए’अंतर्गत (गटांमधील वैर वाढवणे) कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, आयोगाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही, असे जोंधळे यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in