दिल्ली उच्च न्यायालयाची न्यूजक्लिकला नोटीस

ईडी आधीपासूनच या प्रकरणात चालढकल करीत असल्याचा आरोप न्यूजक्लिकच्या वकिलांनी केला आहे
दिल्ली उच्च न्यायालयाची न्यूजक्लिकला नोटीस

नवी दिल्ली : न्यूजक्लिक पोर्टलवर मनी लॉंड्रिंगप्रकरणी कोणतीही बळजबरीची कारवार्इ करण्यास ईडीला मनार्इ करणारा आदेश रद्द करण्याच्या ईडीच्या याचिकेला प्रतिसाद देताना दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी न्यूजक्लिक संस्थेला नोटीस बजावली आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये ईडीने न्यूजक्लिक आणि या संस्थेचे मुख्य संपादक प्रबीर पुर्कायस्थ यांच्यावर मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला होता. त्यानंतर २०२१ साली न्यूजक्लिकने न्यायालयात आपल्यावर कठोर कारवार्इ करण्यापासून ईडीला रोकावे, अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती. न्या. सौरभ बॅनर्जी यांनी नोटिसीला उत्तर देण्यासाठी न्यूजक्लिकला दोन आठवड्यांचा अवधी दिला असून, पुढील सुनावणी ६ सप्टेंबर रोजी ठेवली आहे. ईडीला आधीच्या बेंचने काढलेले दोन आदेश रद्द करून हवे आहेत. दरम्यान, न्यूजक्लिकच्या वकिलांनी हे प्रकरण गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर त्वरित लक्ष देण्याची गरज नाही, असा युक्तिवाद केला आहे. तसेच ईडी आधीपासूनच या प्रकरणात चालढकल करीत असल्याचा आरोप न्यूजक्लिकच्या वकिलांनी केला आहे. न्यूजक्लिकने ३८ कोटींच्या बदल्यात पेडन्यूज प्रसिद्ध केल्याचा आरोप ईडीच्या वकिलांनी केला आहे

logo
marathi.freepressjournal.in