केजरीवालांचे तुरुंगातील वास्तव्य वाढले; जामिनाला दिल्ली उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती

केजरीवाल यांची पत्नी सुनीता यांनी जोरदार टीका केली आहे. केजरीवाल हे जणू काही भारतातील मोस्ट वॉण्टेड दहशतवादीच आहेत, अशी ईडीची कृती आहे, असे सुनीता केजरीवाल यांनी म्हटले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण आर्थिक घोटाळा प्रकरणात विशेष न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला होता, मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी या जामिनाला अंतरिम स्थगिती दिल्याने केजरीवाल यांना कारागृहातच वास्तव्य करावे लागणार आहे.

केजरीवाल यांना २१ मार्च रोजी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने जामिनाला अंतरिम स्थगिती दिली नसती तर केजरीवाल शुक्रवारी कारागृहाबाहेर आले असते. मात्र न्या. सुधीरकुमार जैन यांच्या सुटीकालीन पीठाने विशेष न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली.

विशेष न्यायालयाने केजरीवाल यांना जमीन मंजूर केला होता त्याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आ‌व्हान दिले होते. त्यावर म्हणणे मांडण्यासाठी उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना नोटीस पाठविली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत जामिनाच्या आदेशाला स्थगिती देण्यात येत असल्याचे न्या. सुधीरकुमार जैन यांच्या सुटीकालीन पीठाने म्हटले आहे.

या प्रकरणातील नोंदींची आपल्याला सविस्तर तपासणी करावयाची आहे. त्यामुळे दोन-तीन दिवसांसाठी निर्णय राखून ठेवण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

दहशतवादी असल्यासारखी ईडीची कृती - सुनीता केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विशेष न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर केजरीवाल यांची पत्नी सुनीता यांनी जोरदार टीका केली आहे. केजरीवाल हे जणू काही भारतातील मोस्ट वॉण्टेड दहशतवादीच आहेत, अशी ईडीची कृती आहे, असे सुनीता केजरीवाल यांनी म्हटले आहे.

देशातील हुकूमशाहीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. केजरीवाल यांना गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला. सकाळी तो आदेश अपलोड होणार होता, त्यापूर्वीच ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. केजरीवाल हे जणूकाही भारतातील मोस्ट वॉण्टेड दहशतवादी असल्यासारखी ईडीची ही कृती होती, असे त्या म्हणाल्या.

विशेष न्यायालयाच्या निर्णयाने भाजपचे कारस्थान उघड - संजय सिंह

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आपचे खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशातील न्यायव्यवस्थेची मोदी यांनी खिल्ली उडविल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. विशेष न्यायालयाच्या निर्णयाने भाजपचे कारस्थान उघड झाले असल्याने पक्षाने आप आणि केजरीवाल यांची माफी मागावी, असेही सिंह यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारची गुंडगिरी पाहा. विशेष न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली नाही त्यापूर्वीच मोदींची ईडी उच्च न्यायालयात पोहोचली. कोणत्या आदेशाला आ‌व्हान देण्यासाठी, देशात काय चालले आहे, मोदी तुम्ही न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवली आहे, संपूर्ण देशाचे तुमच्यावर लक्ष आहे, असेही सिंह यांनी म्हटले आहे.

थेट पुरावा सादर करण्यात ईडी असमर्थ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आर्थिक घोटाळ्यामध्ये थेट सहभाग असल्याबाबतचे पुरावे सादर करण्यात सक्तवसुली संचालनालय (ईडी) असमर्थ ठरले आहे, असे विशेष न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना म्हटले होते. प्रथमदर्शनी केजरीवाल यांचा दोष सिद्ध झालेला नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते.

logo
marathi.freepressjournal.in